आजच्या डिजिटल युगात, मुले अनेकदा स्क्रीनसमोरच दिसतात मग ते टीव्ही पाहणे असो किंवा मोबाईल . मनोरंजन म्हणून मुलांना ही साधने जास्त आवडतात. खरं तर लॉकडाउन नंतर झालेल्या डिजिटल शिक्षण आणि त्यासंबंधित असलेल्या स्क्रीन ची जास्त सवय लागली व ती मोडणे पालकांसाठी आता खरी कसरत ठरते आहे. एकंदरीतच स्क्रीन टाइम वाढून मुलांच्या शाररिक आणि मानसिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होताना दिसून येत आहेत.
मुलांना टीव्ही आणि मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी काय केले पाहिजे?
पालकांनी मुलांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजे, फायदेशीर व आरोग्यदायी रुटीन सेट करण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या विकासाला चालना दिली पाहिजे. म्हणजे नेमक काय करायच? ह्यावर अगदी सोप्प उत्तर म्हणजे मुलांना घरातल्या घरात कुठले मनोरंजक व फायदेशीर खेळ खेळता येतील हे शिकवणे तसेच त्यांना टीव्ही आणि मोबईल व्यतिरिक्त काही मनोरंजक पर्याय देता येतात का ह्यावर लक्ष दिले पाहिजे.
मुलांसाठी काही मजेशीर इनडोअर गेम्स:
बिल्डिंग ब्लॉक्स
मुलं वेगवेगळ्या आकारात ब्लॉक्सची मांडणी करून त्यातून त्यांच्या कल्पनाशक्ती नुसार विविध आकार, बिल्डिंग, वस्तु ई. बनवतात. ह्या मजेदार खेळामुळे मुलांच्या भावनिक आणि सामाजिक वाढीस मदत होते तसेच मुलांची समस्या सोडवणे आणि सर्जनशीलता यासारखी व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते.
जेंगा गेम
तुमच्या मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी जेंगा सर्वोत्तम खेळ आहे ज्यामध्ये ब्लॉक्सचा टॉवर बनवलेला असतो आणि त्यातून खेळाडूंना काळजीपूर्वक एक एक ब्लॉक काढावे लागतात. छान बक्षिसे ठरवून मुलांना जिंकण्याची जिद्द निर्माण होऊ शकते तसेच पूर्ण कुटुंब एकत्र खेळाचा आनंद घेऊ शकते.
खजिना शोध(Treasure Hunt)
लहान मुलांना लपलेल्या वस्तू शोधणे आवडते विशेषत: जेव्हा शेवटी बक्षीस मिळणार असते. घरात किंवा घराभोवती तुम्हाला हवे तितके क्लू ठेवू शकता आणि शेवटी जे मुलांना आवडते खजिना म्हणून ठेवू शकता. खजिना शोधणे पालक आणि मुलांसाठीही मजेशीर खेळ असू शकतो.
झिग-झॅग अडथळे( Indoor obstacle)
घरामध्ये विविध अडथळे निर्माण करून एका निश्चित टार्गेट पर्यंत पोहचायचे असते ज्यात मुलांच्या शारीरिक हालचाली जसे की टेबलाखाली रेंगाळणे, उडी मारणे, अडथळे ओलांडणे, ई. चा समावेश होऊ शकतो. ह्यामुळे मुलांना आणि पालकांना एकत्र वेळ घालवता येतो तसेच मुलांचे काही कौशल्य वाढण्यास मदत मिळते.

कॅरम
हा बऱ्यापैकी सगळ्याच मुलांचा आवडता खेळ आहे ज्यात पालक व मूलं एकमेकांसोबत चांगला वेळ घालवू शकतात. कॅरम सामान्यतः गटांमध्ये खेळला जाणार खेळ असतो म्हणून परस्परसंवाद आणि टीमवर्कला चालना मिळू शकते. धोरणात्मक विचार, नियोजन, हात-डोळ्यांचे समन्वय, आणि अचूक नियंत्रण ह्यासारखे कौशल्य वाढू शकते.
लुडो
लुडो हा जरी डिजिटल डिवाइस वर खेळता येतो तरी पालकांनी मुलांना एकत्र बसवून लुडो बोर्ड घेऊन खेळण्यास प्रोत्साहित करावे. हा खेळ अंकगणित व मोजणी कौशल्ये सुधारण्यास मदत करतो. तसेच मुलांना संयम, नियोजन कौशल्य, दूरदृष्टी आणि वैचारिक क्षमता वाढवण्यास मदत करतो.
बुद्धिबळ
बुद्धिबळ हा पालक व मुलं दोघांसाठी फायदेशीर गेम आहे ज्यामुळे वेळ तर चांगला जातोच पण शिकायलाही खूप मिळते. ह्या खेळामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती, आणि संज्ञानात्मक कौशल्ये वाढण्यास मदत होते. तसेच समस्या सोडवण्याची व निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते.
पझल बोर्ड वरील कोडी
ह्या खेळात जिगसॉ पझल, सुडोकू आणि इतर काही कोड्यांचे गेम समाविष्ट आहेत ज्यात एकाग्रता संयम आणि तर्कशास्त्र वाढण्यास मदत मिळते. समस्या सोडवण्याची कौशल्ये, काम किंवा कोडी पूर्ण करण्याची चिकाटी वाढते आणि संज्ञानात्मक विकासास प्रोत्साहन मिळते.
ह्या खेळांव्यतिरक्त संगीत खुर्ची, कार्ड मॅचिंग, लिंबुचमचा, आणि पॉलिमर क्ले हे खेळ सुद्धा खेळता येतात. पण ह्या सगळ्या गेम्स मुळे मुलांच्या सवयी बदलतीलच असे नाही म्हणून त्यांना काही चांगल्या सवयींसाठी प्रोत्साहित करणे हे देखील महत्वाचे ठरते.
सारांश
इनडोअर गेम्स मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी आणि स्क्रीन टाइम पासून दूर ठेवण्याचा उत्तम पर्याय आहे. ह्या खेळांचे अनेक आरोग्य आणि विकासात्मक फायदे आहेत तसेच त्यांचा दैनंदिन दिनचर्येमध्ये समावेश केल्याने पालक मुलांना आरोग्यदायी सवयी विकसित करण्यास मदत करू शकतात. टीव्ही आणि मोबाईल सारख्या उपकरणांवर अवलंबून न राहत मुलं खेळांमध्ये स्वतःचे मनोरंजन शोधून आनंदी राहतात. खेळांना महत्व देणे हे सर्वांगीण विकासाला चालना देते आणि मुलांची संतुलित जीवनशैलीने वाढ होणे सुनिश्चित करते ज्यामुळे मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य आपोआपच जोपासले जाते.
प्रश्नोत्तरे
मोबाईल किंवा टीव्हीचा अतिवापर मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो का?
वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांसाठी अनेक धोकादायक परिणाम समोर आले आहेत ज्यात डोळ्यांचा नंबर वाढणे, पाठदुखी, झोपेचे व भुकेचे चक्र विसकटणे, वजन वाढणे, तसेच नैराश्य वाढणे याचा समावेश होतो. ह्या व्यसनाने पालक आणि मुलांची आपापसातील चिडचिड वाढणे आणि त्यांच्या शैक्षणिक परिणामांमुळे चिंता वाढणे हे देखील आढळून आले आहे.
मुलांना मोबाईलचे व्यसन कसे लागते?
मोबाईल हा सगळ्यांच्याच जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे, नकळत तो मुलांच्याही रुटीनमधील एक भाग बनला आहे. पालकही सतत मोबाइल बघत असतात आणि मुले त्यांचे अनुकरण करता. मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी, त्यांचे रडण थांबवण्यासाठी, त्यांना गुंतवण्यासाठी आणि बऱ्याचदा मूल जेवत नाहीत म्हणून पालक मोबाईलवर किंवा टीव्हीवर त्यांना गाणी किंवा कार्टून लावून देतात ज्यामुळे मुलांना वाईट सवयी लागतात.