मुलांसाठी योग्य पौष्टिक आहार आणि चांगल्या सवयी

Healthy diet for kids-arogyamdhansampda

मुलांसाठी योग्य पौष्टिक आहार आणि चांगल्या सवयी

मुलांनी पौष्टिक आहारची सवय आणि आरोग्यदायी दिनचर्या विकसित केली आहे की नाही याची खात्री करणे म्हणजेच त्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे. आजकाल जरी फास्ट फूड हा पालक व मुलं दोघांच्या आवडीचा पर्याय असला तरी त्याचे आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम दुर्लक्षित केले जाऊ शकत नाहीत. म्हणून पालकांनी मुलांच्या पोषक आहाराच्या सवयी आणि योग्य दिनचर्येला प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय पाऊल उचलणे गरजेचे ठरते. मुलांना चांगल्या सवयी लावण्याकरता पालकांसाठी कुठले महत्वाचे उपाय केले पाहिजेत हे आपण ह्या लेखात पाहणार आहोत.

जेवणाचे नियोजन: जेवणाचे आगाऊ नियोजन केल्याने निरोगी, भरपूर पौष्टिक आणि घरगुती जेवण सहज उपलब्ध होण्यास मदत होते. म्हणून व्यस्त शेड्यूल मध्ये सुद्धा हेल्दी जेवण झटपट आणि वेळेत मिळू शकते. जेवणाचे असे नियोजन केल्याने त्यात पोषक घटकांचा समावेश करून आहार अधिक संतुलित बनवू शकता. ह्यामूळे मुलांना पौष्टिक जेवणाची सवय लागते.

घरी बनवलेले जेवण: घरी जेवण तयार केल्याने पालक अन्नातील घटक आणि पौष्टिक सामग्री नियंत्रित करू शकतात. यामुळे मुलांना सकस आहार मिळतो तसेच त्याबद्दल त्यांना माहिती देखील मिळते. घरी बनवलेले जेवण सामान्यत: ताजे असते आणि फास्ट फूडच्या तुलनेत अधिक पौष्टिक असते त्यामुळे मुलांना निरोगी खाण्याच्या सवयी लागतात. मुलांना स्वयंपाकाच्या पद्धती शिकवण्याची संधी मिळते तसेच पालकांना मुलांसोबत छान वेळ घालवता येतो.

निरोगी स्नॅक्स: फळे, भाज्या, दूध, ड्रायफ्रुट्स, दही यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांना आणि ह्या सामग्रीने बनलेल्या स्नॅक्सला प्राधान्य देऊन बाहेरील सकस नसलेल्या आहारास सोयीस्कर पर्याय सहज उपलब्ध होऊ शकतात. निरोगी खाद्यपदार्थ दिवसभर ऊर्जेची पातळी राखण्यात मदत करतात. त्यातील अत्यावश्यक पोषक तत्वे मुलांच्या वाढ आणि विकासात फायदेशीर ठरतात.

पालकांच्या चांगल्या सवयी: मुले अनेकदा त्यांच्या पालकांच्या वर्तणुकीची नक्कल करतात आणि म्हणूनच पालकांनी पौष्टिक पदार्थ निवडून मुलांना देखील त्यासाठी प्रेरित केले पाहिजे. सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे आहारात समाविष्ट  केल्या पाहिजेत. अनुकरण केलेल्या सवयींचे फायदे लक्षात आल्यानंतर मुलं आपोआपच सगळ्या चांगल्या सवयींचे अनुकरण करू लागतात.  

पोषणाचे महत्त्व: मुलांना पोषणाचे महत्त्व आणि जंक फूडचे नकारात्मक परिणाम शिकवले पाहिजेत ज्यामुळे ते निरोगी व आवश्यक असलेल्या निवडी करण्यासाठी प्रोत्साहित होतात. अश्या चांगल्या सवयी लागल्याने ते स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतात. पालकांनी पोषक आहारावर मुलांशी चर्चा करून त्यांची आवड वाढवली पाहिजे ज्यामुळे कौटुंबिक वेळ चांगला जातोच पण चांगल्या सवयी सुद्धा जोपासल्या जातात.

फास्ट फूडच्या मर्यादा: संपूर्ण कुटुंब किती वेळा जंक फुडचा पर्याय निवडते हे अभ्यासून किती वेळा खाऊ शकते यावर मर्यादा निश्चित करा. यामुळे त्याचे मर्यादित सेवन होऊन शरीरावरील घातक परिणाम जसे की अतिरिक्त चरबी, साखर आणि कॅलरीजची वाढ टाळू शकतात. फास्टफूड चे मुलांच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम समजावून सांगणे फायद्याचे ठरते जेणेकरून त्यांना नेहमीच पोषक आहाराची निवड करण्याची सवय लागते.

नियमित व्यायाम: मुलांना खेळ तसेच इतर शारीरिक उपक्रमात सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहित करा ज्यामुळे नियमित व्यायामाकडे लक्ष केंद्रित होऊन, भूक वाढून त्यांची आपोआपच सकस आहाराकडे ओढ वाढते. नियमित व्यायामामूळे शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्तबद्ध दिनचर्या कशी जोपासली जाते ह्याचे महत्व सांगणे जास्त फायदेशीर ठरते.

सारांश

दैनंदिन दिनचर्येत ह्या सवयींचा समावेश केल्याने मुलांचे आरोग्य लक्षणीयरीत्या सुधारू शकते ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो, निरोगी राहिल्याने ते शैक्षणिक प्रगतीवर जास्त लक्ष देऊ शकतात, आणि त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. पालकांनी मुलांना ह्या सवयींचे महत्व सांगितल्याने, वारंवार चर्चा केल्याने आणि त्या सवयींचे एकत्रित पालन केल्याने कौटुंबिक वातावरण आनंददायी राहण्यास मदत मिळते.

मुलांसाठी निरोगी खाणे अधिक आवडीचे कसे बनवू शकतो?

वेगवेगळ्या पदार्थांचे किंवा जेवणाचे रंगीबेरंगी आणि मजेदार सादरीकरण करा ज्यामुळे त्यांचे आकर्षण वाढून खाण्याबद्दलची आवड तयार होईल. ते पदार्थ बनवताना मुलांना सहभागी करून घेणे हा सुद्धा चांगला पर्याय ठरू शकतो.

मुलांना शारीरिकरित्या अधिक सक्रिय होण्यासाठी कसे प्रोत्साहित करू शकतो?

मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे खेळ, नृत्य किंवा इतर शारीरिक क्रियामध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करा ज्यामुळे ते आवडीने सक्रिय होतील. व्यायामासाठी दैनंदिन दिनचर्या निश्चित करून तुम्ही देखील त्यांच्यासोबत व्यायाम करा म्हणजे मुलांना प्रेरणा मिळेल 

One thought on “मुलांसाठी योग्य पौष्टिक आहार आणि चांगल्या सवयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top