मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी १० सोपे आणि प्रभावी मार्ग

Confidence Kids

मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी १० सोपे आणि प्रभावी मार्ग

10 Simple and Effective Ways to Build Confidence in Kids

प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मविश्वास हा जगण्याचा मूलभूत पाया असतो. हा आत्मविश्वासाचा पाया अगदी लहानपणापासूनच मजबूत असेल तर कोणतीही अडचण आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे अशक्य नाही. प्रत्येक पालकांनी मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याची जबाबदारी अत्यंत काटेकोर पणे पाळली पाहिजे. तरच प्रत्येक मुलं आपल्या  जीवनाचा आनंद समाधानी आणि यशस्वी होऊन घेईल.

आज प्रत्येकजण आयुष्याच्या वाटेवर अनेक अडचणींचा सामना करत असतो. स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मुलांची लहानपणापासून योग्य जडणघडणं करणे अत्यावश्यक आहे. याची सुरुवात आत्मविश्वास वाढवण्यापासून होते.

मुलं मोठी होत असताना अनेक गोष्टी शिकत असतात, त्यातूनच त्यांच्या क्षमतांचा विकास होत असतो. एखादी गोष्ट करण्याची क्षमता वाढली कि आपोआपच आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वासामुळे आत्मसन्मान आणि विविध गोष्टी करण्याचं कौशल्य वाढत, म्हणून पालकांनी मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याचे 10 प्रभावी उपाय पाहणार आहोत.

child 1864718 640

  1. मुलांना प्रोत्साहित करा पण अतिप्रशंसा टाळा :-

एखादी गोष्ट केल्यानंतर जर पालकांनी मुलांची प्रशंसा केली तर त्यांना त्याचा खूप अभिमान वाटतो. त्यामुळे ते नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, याने आपोआपच कार्यक्षमता वाढते म्हणून मुलांची प्रशंसा करा. पण हे करत असताना खोटी प्रशंसा करणे, अतिप्रशंसा  करणे या गोष्टी शक्यतो टाळा. 

मुले अयशस्वी झाली तर त्यांना कधीच टोमणे मारू नका. कधीही नको त्यावेळी जास्त स्तुती करू नका कारण यामुळे अति आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक गोष्टीत समतोल राखणे आवश्यक आहे.

2. पाल्यांसाठी तुम्ही आदर्श व्हा :-

मुलांच्या खऱ्या शिक्षणाची सुरुवात ही घरातूनच होत असते. जेव्हा तुम्ही काम करत असता, त्यावेळी आपोआपच ते तुम्हाला कामात मदत करतात. कारण ते तुम्हाला आदर्श मानत असतात.तुमच्या स्वतःच्या कौशल्यांचा सुद्धा विकास करून तुम्ही स्वतःला त्यांच्यासाठी आदर्श बनवा.

3. जबाबदारी द्या :-

तुमच्या मुलांना रोजच्या दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या जबाबदाऱ्या द्या. या जबाबदाऱ्या त्यांच्या क्षमतेनुसार असू द्या. त्यामुळे विविध कार्य शिकल्यामुळे क्षमतांचा विकास होऊन आत्मविश्वास वाढेल.

4. विविध उपक्रमांना प्रोत्साहन द्या :-

नेहमी वेगवेगळ्या कौशल्यांचा ,प्रकल्पांचा  सराव करून घ्या. त्यामुळे तुम्ही त्यांची कौशल्य क्षमता ओळखू शकता. विविध प्रकल्पांमध्ये भाग घेतल्यामुळे मुले आनंदी आणि उत्साही होतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. याची अजून एक जमेची बाजू म्हणजे तुम्ही मुलांची बलस्थाने आणि कमकुवतपणा जाणून घेऊ शकता. 

book 1822474 1280

5. त्यांना त्यांच्या स्वतःच्या निवडी स्वतः करू द्या :-

मुलांना लागणाऱ्या  प्रत्येक गोष्टींची निवड त्यांना स्वतः करू द्यावी. जसे की काय खावे, त्यांना स्वतःला काय आवडते, कोणते कपडे घालावेत. अशा गोष्टी त्यांना स्वतः ठरवू द्या. किमान त्यांच्या आवडीनिवडीची जबाबदारी  त्यांना स्वतःला घेऊ द्या. ही कृती करून एक प्रकारे पालक त्यांच्या निर्णय क्षमतेला चालना देऊ शकतात. आपोआपच त्यांची निर्णय घेण्याची क्षमता वाढेलआणि आत्मविश्वास निर्माण होईल. 

या कृतीमुळे मुलांमध्ये अनेकगोष्टींमध्ये रस निर्माण होऊ शकतो.  शिवाय कार्यक्षमता आणि उत्साह दोन्ही गोष्टी वाढीस लागतील.

6. त्यांना स्वतः प्रयत्न करू द्या :-

खूपदा मुलांच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी पालक स्वतःच करत असतात. असे न करता नेहमी त्यांना तयार वस्तू न देता स्वतःला प्रयत्न करू द्या. जसे की शाळेची तयारी स्वतः करणे, शाळेचे दप्तर भरणे, स्वतःचे कपाट आवरणे. यासारख्या गोष्टी स्वतः केल्याने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. या एका कृतीमुळे अनेक गोष्टी साध्य होतील. मुलांमध्ये नीटनेटकेपणा येईल. कार्यक्षमता वाढीस लागून आत्मविश्वास वाढेल.

7. त्यांच्या स्वप्नांना आधार द्या, त्यांच्या भरारीला बळ द्या :-

मुलांचे छंद, महत्वकांक्षा ,त्यांची स्वप्न आपलेपणाने जाणून घ्या. त्यांची आवड आणि कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करू द्या. तुम्ही त्याला पाठिंबा द्या. कारण जेव्हा पालक मुलांवर विश्वास ठेवतात, त्यांचे पूर्ण समर्थन करतात, त्यांचा आत्मविश्वास वाढवतात, त्यांना जबाबदारीची जाणीव करून देतात, तेव्हा मुले निश्चितच  सर्वोत्तम कामगिरी करतात. अशावेळी त्यांना यश मिळो अथवा अपयश प्रत्येक परिस्थितीत मुलांना साथ द्या. अशाप्रकारे तुम्ही त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकता. यामुळे मुले जिद्दीने यश मिळवू शकतील.

photographer 920128 640

8. कोणाशीही त्यांची तुलना करू नका :-

प्रत्येक मुलांमध्ये काही ना काही कौशल्य  आणि विशिष्ट क्षमता असतात.  कोणाची आकलन क्षमता जास्त असते तर कोणाची कमी. कुणी अभ्यासात हुशार असतो तर कोणी संगीतामध्ये. कोणाला चांगलं गाता येत तर कोणी उत्तम तबला वाजवू शकत. 

कोणतीच व्यक्ती सर्व क्षमतांनी परिपूर्ण नसते. त्यामुळे मुलांची इतरांबरोबर केलेली  तुलना त्यांना खूप दुखावते. स्वाभिमान दुखावला जातो. मुलांमध्ये न्यूनगंड वाढला जातो. त्यामुळे आत्मविश्वास कमी होऊन नैराश्य वाटू लागते. इतरांच्या सोबत केलेली तुलना मुलांच्या विकासामध्ये बाधा आणते. हे टाळण्यासाठी त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन द्या पण कधीच तुलना करू नका.

9. त्यांना निस्वार्थ प्रेम द्या :-

मुलांची लहानपणापासून जडणघडण होत असताना अभ्यासामध्ये ,खेळामध्ये अशा सारख्या अनेक गोष्टींमध्ये यश अपयश येत असते. तुमची मुले यशस्वी झाली अथवा अयशस्वी झाली तरी नेहमी त्यांच्या पाठीशी उभे रहा. मुलांना ही जाणीव होऊ द्या ,तुमचे प्रेम निस्वार्थ आहे. त्यांना चांगल्या गोष्टींसाठी प्रेरित करा. तुम्ही केलेले निस्वार्थ प्रेम, दिलेला आधार, तुम्ही दिलेले प्रोत्साहन या सगळ्या गोष्टीं मुलांच्या मनात तुमच्या बद्दलचा आदर जास्त वाढवतो.

 मुलांना नेहमी चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित करा. तुमच्यासाठी नेहमी उपस्थित रहा. मुलांना प्रेरणा मिळेल.

10. त्यांचे मत विचारा :-

तुम्ही त्यांच्या वयानुसार परिस्थिती निर्माण करू शकता. घरातील एखाद्या कार्यक्रमांमध्ये  ,सण –समारंभामध्ये, त्यांना आवर्जून सहभागी करून घ्या. त्यांचे मत विचारा .प्रसंगी काही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी त्यांचा सल्ला विचारात घ्या. त्यांच्या सोबत मैत्री पूर्ण संवाद साधा.

यामुळे मुलांच्या मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. आपण कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहोत जबाबदारीची जाणीव निर्माण होते. आपण मोठ्यांना, ज्येष्ठ लोकांना मदत करू शकतो ही आत्मविश्वासाची भावना निर्माण होते.

सारांश :- आत्मविश्वास बाळगणे काही मुलांसाठी खूप सोपे असते, तर काहींसाठी ते अवघड काम असते. संशोधनात असे आढळून आले आहे की आत्मविश्वास असलेले मूल विविध आव्हाने आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे हाताळू शकते. म्हणून, पालक म्हणून, आपल्या मुलाचे विश्लेषण करणे, त्याची बलस्थाने आणि कमकुवतपणा जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.

प्रश्नोत्तरे :-

आत्मविश्वासाच्या कमतरतेचे मूळ कारण काय आहे?

बालपणी मनावर झालेले आघात, कुटुंबातील नातेसंबंधामध्ये दुरावा, आर्थिक समस्या, सतत तणावपूर्ण वातावरण त्याचप्रमाणे अतिशय गंभीर, कडक शिस्तीचे पालक आणि शिक्षक यामुळे मुले आनंदाने, मोकळेपणाने न  राहता दुःखी, शांत राहतात. या सर्व गोष्टी मुलांमध्ये आत्मविश्वास कमी असण्याचे कारण असतात.

आत्मविश्वास नैसर्गिकरित्या येतो का?

आत्मविश्वास जन्मजात येत नाही ; कालांतराने त्याचा विकास होतो,  तो वाढण्यासाठी प्रोत्साहित करावे लागते.

One thought on “मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी १० सोपे आणि प्रभावी मार्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top