मुलांच्या कोणत्या सवयी त्यांच्या उज्ज्वल भविष्यात अडथळा आणू शकतात?

good habits for children

मुलांच्या कोणत्या सवयी त्यांच्या उज्ज्वल भविष्यात अडथळा आणू शकतात?

आजच्या डिजिटल युगात, पालकांबरोबरच मुलांची सुद्धा दररोज कसरत सुरू असते आणि त्यामुळे कुटुंब फार कमी वेळा एकत्र आनंदी वेळ घालवू शकत. मुलांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने किंवा कधी कधी लक्ष देऊन सुद्धा मुलांमध्ये काही सवयी तयार होतात ज्या भविष्यात अपायकारक ठरू शकतात. म्हणून पालकांनी सतर्क राहून मुलांच्या सवयींचे निरीक्षण केले पाहिजे आणि चुकीच्या सवयी वेळेतच बदलल्या पाहिजेत. ह्या ब्लॉगमध्ये आपण मुलांच्या काही हानिकारक सवयी व त्यावर उपाय बघणार आहोत.

सगळ्याच वयोगटातील मुलांमध्ये काही सामान्य पण पालकांसाठी त्रासदायक सवयी असतात जसे की बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याचा हट्ट करणे, अभ्यासाचा कंटाळा करणे, अस्वच्छता राखणे, ई. ह्या सवयी समजावून सांगून किंवा ओरडून बऱ्या होतात परंतु काही गंभीर सवयी त्यांच्या भविष्यावर परिणाम करू शकतात जसे की:

इंटरनेटचा अतिवापर करणे

मुलांसाठी इंटरनेट हे अमूल्य संसाधन आहे परंतु त्याचा जास्त वापर अनेक शाररिक आणि मानसिक समस्यांना आमंत्रण देऊ शकतो. सोशल मीडिया, गेमिंग आणि इतर ऍपच्या अति वापरामुळे मुलं विचलित होतात आणि याचा त्यांच्या अभ्यासवर परिणाम होतो. संशोधनातून असे येते की जी मुलं खूप वेळ स्क्रीनसमोर असतात त्यांना डोळ्यांचे त्रास होतात  तसेच बसून, विचित्र अवस्थेत पडून राहिल्याने मणक्याच्या समस्यांमध्ये वाढ झालेली आहे. ह्यामुळे त्यांच्या झोपेचे चक्र खराब होऊन त्यांची चिडचिड वाढू शकते. सोशल मीडियावर जीवनाचे अवास्तव चित्रण बघून त्यांना वाईट सवयी लागून त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

हे धोके कमी करण्यासाठी पालकांनी कुठल्या कामासाठी इंटरनेट आणि मोबाईल वापरला पाहिजे ह्यासाठी काही सीमा ठरवल्या पाहिजेत. तसेच, मुलांना ऑनलाइन वेळ घालवण्यापेक्षा ते अजून कशात मजेदार वेळ घालवू शकतात  हे समजावले पाहिजे. पालकांनी त्यांच्या सोबतच मुलांचे वेळापत्रक बनवून  ते शिस्तीने पाळले पाहिजे, 

सतत मनोरंजनाकडे कल वाढणे

आनंदी राहण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी जर मुलं सतत मनोरंजन शोधत असतील तर त्यांची कल्पनाशक्ती कमी होऊ शकते, कुठल्याही समस्येवर विचार करण्याची आणि उपाय शोधण्याची क्षमता की होऊ शकते, ह्या गोष्टींचा त्यांच्या भविष्यातील वाढीवर परिणाम होऊ शकतो. थोडे तरी मनोरंजन रोज असावे परंतु त्याचे प्रमाण वाढल्यास हानिकारक ठरू शकते. कारण सतत मनोरंजनात गुंतल्यामुळे त्यांच्याकडे वैचारिक क्षमता वाढवण्यास वेळच राहत नाही, परिणामी ते आळशी होतात, त्यांची सर्जनशीलता आणि कलात्मकता कमी होते, आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी संयम आणि चिकाटीची कमतरता होऊ शकते.

मुलांना मनोरंजनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना नाविन्यपूर्ण, कलात्मक, आणि  स्वतंत्र विचारांना चालना देणाऱ्या कार्यांमध्ये गुंतण्यासाठी प्रोत्साहित करा. हे उपक्रम त्यांच्या आवडीनुसार व वयोगटानुसार वेगवेगळे असू शकतात जसे की चित्र काढणे, वाद्य वाजवणे, पुस्तक वाचने, स्वतः लेखन करणे ई.

मैदानी खेळांमधील आवड कमी होणे

मैदानी खेळ फक्त शालेय अभ्यासक्रमांपुरतेच मर्यादित न राहता ते दैनंदिन दिनचर्येचा भाग असले पाहिजेत कारण त्याचे प्रभावी फायदे खूप आहेत. मोबाईल, ऑनलाइन गेम, टीव्ही व इतर मनोरंजन ह्या सगळ्या सवयींमूळे मुलांचा मैदानी खेळांमधील रस कमी होताना दिसून येतो. शरीराचा पुरेसा व्यायाम न झाल्यामुळे लठ्ठपणा, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या, कमकुवत स्नायू आणि हाडे यासारख्या विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक हालचाली आवश्यक आहेत. मैदानी खेळांमध्ये मुलं अनेक उपयुक्त कौशल्ये शिकतात जसे की टीमवर्क, नेतृत्व, संभाषण, आणि नवीन लोकांशी चांगले संबंध तयार करणे. हे सगळे कौशल्य शिकण्याची संधी मुलं गमावू शकतात.

म्हणून, मुलांच्या नित्यक्रमाचा नियमित भाग बनवून खेळ खेळयास त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांना आवडणारे खेळ शोधा आणि सांघिक खेळांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करा.

अंतर्मुख होणे- 

अंतर्मुख असणे हे स्वाभाविकपणे नकारात्मक नसले तरी ह्या वाढत्या प्रवृत्तीमुळे मुलांच्या सामाजिक विकासावर परिणाम होऊ शकतो. काही चुकीच्या सवयींमूळे किंवा वातावरणामुळे जर मूले अंतराभिमुख झाली तर ते सामाजिक संवाद टाळतात ज्यामुळे त्यांना संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करणे आव्हानात्मक वाटू शकते. एकंदरीत त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीवर गंभीर परिणाम होऊन त्यांना भविष्यात खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सामाजिक कार्यांपासून दूर गेल्यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा आणि नैराश्याची भावना वाढून त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

पालकांनी मुलांना त्यांच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढून सामाजिक कार्यक्रमांमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. कौटुंबिक भेटींमध्ये किंवा मित्रांच्या भेटींमध्ये मुलांना सहभागी करून संवाद साधण्याची संधी द्यावी व त्यांना ती सवय लावावी.

पोषक नसलेले खाद्यपदार्थ खाणे

मुलं घरी बनलेल्या जेवणाएवजी बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याचा हट्ट करतात आणि पालक वेळेच्या अभावी किंवा मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी न कळत त्यांना जंकफूडची सवय लावतात. ह्या सवयीमूळे मुलांना गरजेचे असलेले पोषण मिळत नाही आणि म्हणून आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होताना दिसतात. बाहेरील खाद्यपदार्थांमूळे शरीरात साखरेचे प्रमाण, चरबी वाढते ह्यामुळे कमी वयातच लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर गंभीर समस्या उद्द्भवू शकतात. आवश्यक पोषक नसलेल्या आहारामुळे मेंदूचे कार्य, एकाग्रता तसेच नवीन गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

म्हणून, मुलांना संतुलित आहाराचे महत्त्व शिकवा आणि त्यांना निरोगी खाण्याच्या सवयी लावा. जेवणामध्ये विविध फळे, पालेभाज्या, कडधान्य, दूध, आणि इतर आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. मुलांची घरगुती जेवणात आवड निर्माण करण्यासाठी त्यांना जेवण बनवताना किंवा रोजच्या जेवणाचे नियोजन करताना सोबत घ्या.

आर्थिक सवयी आणि हट्ट

आपल्या मुलांना सगळ्या सुख-सोयी पुरवण्यासाठी आणि लाड करण्यासाठी पालक मुलं मागतील ते घेऊन देतात आणि मुलांना आनंदी ठेवतात. परंतु, ह्या थोड्या वेळाच्या आनंदासाठी पालक मुलांच्या आयुष्यभरासाठीच्या सवयी खराब करतात. कुठलेही खेळणे, कपडे व इतर वस्तु घेण्यासाठी हट्ट केल्यास पालक आपल्याला ते घेऊन देतात हे कळल्यावर मुलं तसेच वागतात. ह्यामुळे ते अधिक खर्चिक , हट्टी, व तक्रारी स्वभावाचे बनतात. या खराब सवयी पालकांसाठी त्रासदायक ठरून , मुलांच्या भविष्यावर परिणाम करू शकतात. 

मुलांना जपून पैसे वापरण्याची, गरजेपेक्षा जास्त खरेदी टाळण्याची आणि समंजसपणा वाढवण्याची सवय योग्य वयात लागली पाहिजे.

वैयक्तिक स्वच्छता

मुलांना योग्य वयोगटात वैयक्तिक शारीरिक स्वच्छता राखण्याची आणि घरात देखील नीटनेटकेपणा राखण्याची सवय लावणे आवश्यक आहे. स्वच्छ आंघोळ करणे, नख काढणे, टापटीप राहणे, कपडे स्वच्छ ठेवणे, नीट जेवणे यांसारख्या सवयी तसेच घरात जागच्या वस्तु जागी ठेवणे, स्वतःच्या वस्तु नीट सांभाळणे, घर प्रसन्न ठेवणे ह्या काही मूलभूत सवयी जर मुलांना नसल्या तर भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. ह्या सवयी नसल्या तर मुलं अस्वच्छ राहू लागतात ज्यामुळे त्यांना अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

मुलांचे संस्कार चुकीचे आहेत असा समज होऊ शकतो तसेच त्यांची चुकीची छाप पडू शकते जे त्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करू शकते. म्हणून मुलांना लहानपणीच ह्या मूलभूत सवयींचे महत्व पटवून देणे पालकांचे कर्तव्य आहे.

गैरवर्तन

मुलांना लहानपणापासूनच मूलभूत शिष्टाचार शिकवणे हे पालकांचे कर्तव्य असते आणि ते ठराविक वयातच होऊ शकते. कारण एकदा मुलांना लहानपणी खराब वर्तवणुकीची सवय लागली तर ती मोडणे अवघड होते. पालक जर कठोर ,अपमानास्पद भाषा वापरत असतील तर मुलं ते ऐकून बोलण्यात अनुकरण करतात. चिडचिड आणि हट्ट करताना मुलं चुकीचे शब्द सहज वापरू लागतात आणि गैरवर्तन करू लागतात. त्यांच्यात वेळेत चांगले बदल झाले नाही तर मोठ झाल्यावर सुद्धा ही सवय तशीच राहते जी त्यांना कठोर आणि अधिक चिडचिडा बनवू शकते ज्यामुळे पालकांना नातेवाईक किंवा इतरां समोर नक्कीच अपमानास्पद वाटू शकते.

म्हणून मुलांना शांतपणे प्रेमळ आणि चांगले संवाद करण्याची सवय विकसित करणे अत्यावश्यक ठरते. मोठ्या माणसांशी नम्रतेने बोलणे, कृपया/ धन्यवाद असे कृतज्ञतेचे शब्द वापरणे अश्या सवयी त्यांचे चांगले संस्कार दाखवतात आणि आयुष्यभरासाठी  एक चांगली सवय लागते.

सारांश

मुलांना लहानपणी लागलेल्या वाईट सवयींचा भविष्यात त्रास होऊ शकतो आणि ह्या सवयी त्यांच्या भविष्यातील आरोग्य आणि यशावर लक्षणीय परिणाम करू शकतात. म्हणून पालकांनी लहानपणीच सवयी बदलून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पाया करणे आवश्यक आहे. मुलांची शारीरिक आणि मानसिक प्रगती होण्यासाठी संतुलित आहार देणे आणि सोबत संतुलित वातावरण तयार करणे गरजेचे आहे.

प्रश्नोत्तरे

मुलांमध्ये वाईट सवयी लागण्याची कारणे कोणती?

जेव्हा मुलांना कंटाळवाणे, निराश, असुरक्षित आणि एकटे वाटते तेव्हा त्यांना चुकीच्या सवयी लागू शकतात. काही वेळ घरातील वातावरणामुळे आणि मोठ्या माणसांचे अनुकरण करून सुद्धा त्यांच्या सवयी बिघडू शकतात.

भविष्यात अडथळा बनतील अशा  सवयी मोडण्यासाठी पालकांनी काय केले पाहिजे?

पालकांनी मुलांशी मोकळेपणाने बोलणे खूप महत्वाचे ठरते ज्यामुळे मुलं त्यांची चिडचिड, राग, व भावना सांगतात. ह्यामुळे पालक त्यांच्या मनाची स्थिति ओळखून त्यांना मार्गदर्शन करू शकतात आणि योग्य सवयी निवडण्यासाठी मदत करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top