लहान मुलें स्वतः निरीक्षण करून आणि सभोवतालचे वातावरण बघून काही गोष्टी आत्मसात करतात. त्यातूनच त्यांच्या सवयी विकसित होतात. सहाजिकच, लहानपणी मनोरंजन होईल अश्या गोष्टींकडे त्यांचे जास्त लक्ष जाते आणि त्यामुळे ते एका ठिकाणी खूप वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. परंतु मुलांच्या विकासात एकाग्रता खूप महत्वाची ठरते आणि म्हणूनच त्यांचे शालेय शिक्षण सुरू होण्याआधी त्यांना एकाग्रता म्हणजे काय, ती कशी वाढवावी आणि त्याचे फायदे सविस्तर सांगणे आवश्यक आहे. याबरोबरच आपण पालक म्हणून त्यांना ह्यात मदत करणे हे आपले कर्तव्य असले पाहिजे.
मुलांमध्ये एकाग्रता त्यांच्यात असलेला नैसर्गिक उत्साह आणि त्यांना वाटणारे कुतूहल ह्यावर अवलंबून असू शकते. जसजसे ते मोठे होतील तसतसे त्यांचे अभ्यासावर आणि इतर आवश्यक कामांवर लक्ष केंद्रित गरजेचे राहील. म्हणून मुलांच्या शैक्षणिक यश आणि सर्वांगीण विकासासाठी एकाग्रता कशी वाढवता येईल ह्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. ह्या ब्लॉग मध्ये आपण बघूया की एकाग्रता का महत्वाची आहे आणि ती आपण कशी वाढवू शकतो.
शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी एकाग्रता का महत्त्वाची आहे?
एकाग्रतेच्या अभावाने मुलं योग्य दिशेने लक्ष केंद्रित करू शकत नाहीत जे मुलांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम करते व त्यांचा आत्मविश्वास कमी करते. शैक्षणिक बाबींमध्ये मुलांचे लक्ष नसल्यास त्यांचा पुढील जीवनावर परिणाम होऊ शकतो तसेच सतत विचलित होण्याची सवय लागली तर ते कुठलेच काम एकट्याने आणि आत्मविश्वासाने करू शकत नाहीत. ह्यामूळे त्यांना नैराश्य येऊ शकते तसेच अनेक मानसिक त्रासांचा सामना करावा लागू शकतो. त्यांना सतत कोणावरतरी अवलंबून राहावे लागू शकते आणि त्यातून आळस निर्माण होऊ शकतो.
मुलांची एकाग्रता कशी वाढवायची?
लक्ष केंद्रित न होण्याची बरीच कारणे असून पण फक्त समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्यावर उपाय शोधणे नेहमीच फायदेशीर ठरते. म्हणूनच मुलाची एकाग्रता पातळी कुशलतेने सुधारण्यासाठी येथे काही प्रभावी मार्ग देत आहोत.
विचलनापासून दूर राहणे
तुम्ही पालक म्हणून मुले कमीत कमी विचलित होऊन त्यांचा अभ्यास, कामे किंवा इतर रुटीन पळतील असे वातावरण निर्माण करणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. मुलांना टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया व इतर गोंगाट करणाऱ्या गोष्टींपासून दूर ठेवा. जोपर्यंत मुले त्यांना आवडणाऱ्या कामांमध्ये गुंतत नाहीत तोपर्यंत ते एकाग्रतेने कुठलेही कार्य किंवा अभ्यास करू शकत नाहीत. म्हणून त्यांना अश्या व्यत्यय आणणाऱ्या गोष्टींपासून दूर ठेवणे खूप आवश्यक आहे.
तसेच, मुलांची आणि पालकांची रोजची दिनचर्या तितकीच महत्वाची ठरते. मुलांचे जर वेळापत्रक ठरलेले असेल आणि ते पाळायची त्यांना सवय लागली असेल तर त्यांच्याकडे रिकामा वेळ राहत नाही ज्याने ते विचलित होत नाहीत.
शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देणे
लहान मुलांमध्ये भरपूर ऊर्जा असते आणि तिचा योग्य पद्धतीने उपयोग होणे गरजेचे असते म्हणून मुलांच्या पुरेश्या शारीरिक हालचाली कश्या होतील ह्याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. व्यायाम फक्त शरीरासाठीच नव्हे तर मनासाठीही चांगला आहे . म्हणून मुलांच्या खेळण्याचा वेळा ठरवून त्यांना मनसोक्तपणे खेळू दिले पाहिजे, त्यांच्या आवडत्या खेळांमध्ये ते कसे कुशल होतील ह्याकडे लक्ष दिले पाहिजे.
भरपूर शारीरिक हालचाली मुलांचा कंटाळवाणेपणा कमी करण्यास मदत करतात, त्यांना तंदुरुस्त ठेवतात आणि यातून आपोआपच ते आनंदी राहून त्यांची चपळता आणि एकाग्रता वाढते.
पोषक आहाराची सवय लावणे
मेंदूच्या कार्यामध्ये पोषण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते म्हणूनच हे मूल किती चांगले लक्ष केंद्रित करते ह्याचा थेट संबंध निरोगी अन्न खाणे याच्याशी आहे. जंक फूड किंवा साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने मुलं आळशी होतात म्हणून आहारात हिरव्या भाज्या, बदाम, अंडी, कडधान्य, फळे, दूध ई. चा समावेश असणे आवश्यक आहे. मुलांना सकस आहार घेण्याची सवय लागली तर ते रोज आवडीने ते पदार्थ खातात त्यामुळे जंकफूड खाणे टाळता येते आणि त्यांच्या वाढीला गरजेचे असलेले सगळे घटक त्यांना मिळून ते निरोगी राहतात.
म्हणूनच चांगला आहार जागरूकता वाढवण्यासाठी, मन तीक्ष्ण करण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी अत्यावश्यक ठरतो.
जागकरुता वाढण्यासाठी ध्यान करणे
ध्यानधारणा हा एकाग्रता वाढण्याचा सगळ्यात चांगला आणि सोपा पर्याय आहे. मुलांना व्यायामासोबतच ध्यान करण्याची सवय लावली पाहिजे ज्यामुळे चांगल्या एकाग्रतेचे कौशल्ये विकसित करण्यात मदत होऊ शकते. नियमित काही मिनिटे श्वासोच्छवासाचे व्यायाम केल्याने ते निरोगी राहू शकतात, त्यांचे मन शांत राहण्यास मदत होते आणि ते कुठल्याही कामात लक्ष केंद्रित करू शकतात.
ध्यानामुळे मुलांमध्ये सकारात्मकता, सजगता वाढते आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते आणि त्यांना अभ्यासात यश मिळण्यास मदत होते.
शांत व पुरेश्या झोपेची सवय लावणे
मेंदूच्या कार्यासाठी आणि एकाग्रतेसाठी झोप महत्त्वाची आहे पालकांनी मुलांच्या झोपेच्या वेळा ठरवल्या पाहिजेत. अपुरी झोप न झाल्याने मुलं चिडचिड करतात आणि हे सातत्याने झाल्यास त्यांना आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते तसेच अस्वस्थता वाटून त्यांचा कुठलेही कार्य करण्याचा रस राहत नाही.
एकाग्रता वाढवण्यासाठी चांगली व पुरेशी झोप होणे खूप महत्वाचे ठरते म्हणून झोपताना मोबाईल, टीव्ही आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टी टाळा म्हणजे मुलं लवकर झोपतात. रात्रभर शांत झोपून मुलं सकाळी आनंदी आणि फ्रेश राहतात ज्यामुळे ते अभ्यास आणि इतर काम आवडीने व एकाग्रतेने करतात.
एकाग्रता वाढवणारे खेळ व छंद जोपासणे
तुमच्या मुलांची एकाग्रता, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, मानसिक चपळता आणि इतर कौशल्ये वाढवण्यासाठी विविध खेळ खेळू शकता. विचार करायला लावणारे, तपशीलवार नियोजन आणि स्मरणशक्तीचा वापर करायला लावणारे वेगवेगळे खेळ बाजारात मिळतात ज्यामुळे मुलं आवडीने हे गेम खेळून एकाग्रता वाढवू शकता.
खेळांबरोबरच चित्र काढणे, रंग भरणे, पेपर किंवा माती पासून वेगवेगळ्या वस्तु बनवणे, एखादे वाद्य वाजवणे यासारख्या छंदांना प्रोत्साहन द्या जे मुलं लक्ष देऊन आवडीने करतात. तुम्ही घरातील काही कामे ज्यातून मुलांना लक्ष केंद्रित करता येईल जसे की गोष्टी क्रमाने लावणे, जेवणाचे टेबल सेट करणे, ई. ची त्यांना सवय लाऊ शकता.
सारांश
एकाग्रता, योग्य दिनचर्या आणि चांगल्या सवयी या सगळ्यांच्या अभावामुळे मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि पालक म्हणून तुम्हाला ते सुधारण्यासाठी खूप वेळ द्यावा लागू शकतो. म्हणून लहानपणापासूनच मुलांना चांगल्या सवयी लाऊन त्यांचे प्रोत्साहन वाढवत राहणे हे पालकांचे कर्तव्य आहे. दैनंदिन दिनचर्येत आरोग्यदायी सवयी जोपासून मुलांची एकाग्रता चांगली ठेवा ज्यामुळे ते शाळेत आणि भविष्यात यशस्वी होऊ शकतील.
प्रश्नोत्तरे
मुलांचे एकाग्रता आणि मानसिक आरोग्य ह्याचा काही परस्पर संबंध आहे का?
एकाग्रता कमी असल्याने मुलं कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यास वेळ लावतात ज्यामुळे ते मागे पडून त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि आपोआपच ह्याचा त्यांना मानसिक त्रास होऊ शकतो.
आजच्या जीवनशैलीचा मुलांच्या एकाग्रतेवर काही परिणाम होतो का?
पालकांच्या व्यस्त कामकाजामूळे मुलांना हवा तेवढा वेळ देऊ शकत नाहीत त्याबरोबरच मुलं त्यांच्या व्यस्त शैक्षणिक वेळापत्रकानुसार व्यस्त असतात त्यातून त्यांना विश्रांती घ्यायला पुरेसा वेळ मिळत नाही ह्या सगळ्यामुळे त्यांच्या एकूणच मानसिकतेवर परिणाम होतो. चिडचिड आणि हट्ट वाढून त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते.