बाजारात येणारे भेसळयुक्त पदार्थ आपल्या आरोग्यासाठी धोका निर्माण करतात. आपण जेवण बनवण्यासाठी जे पदार्थ किंवा तयार खाद्यपदार्थ आणतो त्या अन्नाची सुरक्षितता आणि शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी भेसळ विषयी जागरूक राहणे आणि आवश्यक खबरदारी घेणे अधिकाधिक महत्त्वाचे आहे. भेसळ म्हणजे कुठल्याही पदार्थाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि जास्त नफा कमवण्यासाठी हानीकारक व निकृष्ट दर्जाचे पदार्थ खाद्यपदार्थांमध्ये मिसळणे. हे पदार्थ नियमित खाल्याने आरोग्यावर सौम्य ते गंभीर परिणाम होऊ शकतात या ब्लॉगमध्ये भेसळयुक्त पदार्थ ओळखण्याच्या पद्धती आणि अन्नपदार्थ शुद्ध असल्याची खात्री करून तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स बघणार आहोत.
रोज वापरात येणाऱ्या पदार्थांमध्ये भेसळ कशी ओळखाल?
दुधातील भेसळ कशी ओळखाल?
- दुधाला पांढरेशुभ्र करण्यासाठी साबण, डिटर्जंट पावडर आणि इतर भरपूर हानिकारक केमिकल मिक्स केले जातात. तसेच शाम्पू, फॅब्रिक कलर, ग्लुकोज मिसळून दूध एकदम शुद्ध दुधासारखे दिसते.
- कृत्रिम दुधात प्रामुख्याने साबण वापरला जातो. ते ओळखण्यासाठी दूध बोटांवर घेऊन घासून बघावे त्यातून साबणाचा वास येत असेल किंवा फेस तयार होत असेल तर दूध भेसळयुक्त आहे हे कळते.
- दुधाचे काही थेंब पॉलिश केलेल्या पृष्ठभागावर टाकल्यास जर ओघळताना मागे दुधाचे डाग राहिले तर दूध शुद्ध आहे आणि डाग राहिले नाहीत तर दूध भेसळयुक्त आहे असे समजायचे.
- सिंथेटिक दुधाला नैसर्गिक दुधासारखी चव यावी म्हणून त्यात युरिया मिसळतात आणि त्याची रासायनिक चाचणी करण्यासाठी दुधात अर्धा चमचा सोयाबीन पावडर मिसळून त्यात लिटमस पेपर टाका. या पेपरचा रंग लाल किंवा निळा झाला तर दुधात भेसळ आहे असे समजायचे.
भेसळयुक्त मसाले कसे ओळखाल:
1) मसाल्यांमूळे जेवणात रंग येण्यासाठी त्यात कृत्रिम रंग मिसळले जातात. थोडे मसाले घेऊन ते पाण्यात मिसळा जर पाणी रंगीत झाले तर मसाले भेसळयुक्त आहेत.
2)हिंगातील भेसळ ओळखण्यासाठी एका चमच्यात हिंग घेऊन ते आगीजवळ न्यावे जर हिंग कापरासारखे जळाले तर हिंग शुध्द आहे समजावे. तसेच थोड्या हिंगात आयोडीन टाकल्यास त्याला निळा रंग आला तर हिंग भेसळयुक्त आहे असे समजायचे.
3)काळ्या मिरी मध्ये पपईच्या बियांची भेसळ होते पाण्यात टाकल्यावर त्या पाण्यावर तरंगतात
4)बऱ्याचवेळा तेल काढून लवंग विकली जाते जी लहान आकाराची व सुकल्यासारखी दिसते. थोड्या लवंग पाण्यात टाकाव्यात जर त्या वर तरंगत असतील तर भेसळ असलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या लवंग आहेत असे समजायचे.
भाज्यांमधील भेसळ कशी ओळखाल:
1) हिरव्या भाज्यांमध्ये होणाऱ्या भेसळमध्ये सहसा भाज्यांना रंग लावणे किंवा ताज्या दिसाव्यात म्हणून फवारणी करणे हे उपाय वापरले जातात. महत्वाचे म्हणजे ह्या भाज्या पिकवताना जी खते व औषधे वापरली जातात त्यातील गुणधर्म भाज्यांमध्ये येऊन त्यांची पोषाकता कमी होऊन त्या हानिकारक देखील ठरू शकतात.
2)हिरव्या भाज्यांमध्ये अधिक तर मॅलाकाइट ग्रीन ह्या रासायनिक रंगाची भेसळ आढळून येते. ते तपासण्यासाठी भाज्या पाण्यात ठेवल्यास त्यांचा रंग पाण्यात उतरतो आणि भेसळ निदर्शनात येते.
भेसळ युक्त फळे ओळखण्याची पद्धत
1) बाजारात येणारे बरेचसे फळं कृत्रिम पद्धतींनी म्हणजेच रसायने वापरुन पिकावली जातात ज्यामुळे त्यातून मिळणारे नैसर्गिक पोषक तत्व कमी होतात. फळे खाऊन शरीराला कुठलाही त्रास होऊ नये ह्यासाठी फळे घेताना निदान ते भेसळ झालेली नसावीत हे तपासणे अत्यावश्यक ठरते.
2) फळेअधिक काळ ताजी राहण्यासाठी बऱ्याच वेळेला त्यावर मेणाचा लेप लावला जातो, हे ओळखण्यासाठी फळांवर चाकू किंवा चमचा वापरुन हलक्या हाताने घासावे , मेणाचा थर निघू लागतो. अशी फळे साल काढून खाल्लेले फायद्याचे ठरते.
3) फळाचा तुकडा पाण्यात बुडवल्यावर जर बुडबुडे सोडत असेल किंवा रंग बदलत असेल तर त्यावर हानिकारक रसायनांनी लेप लावलेला असू शकतो.
कडधान्यातील भेसळ कशी ओळखाल:
1)अनेक कडधान्यांना स्वच्छ आणि चांगले दिसण्यासाठी रंग लावून पॉलीश केलेले असते
2)डाळी हाताने चोळा आणि जर तुमचे हात पिवळे झाले तर डाळींवर कृत्रिम रंग लावून भेसळ केली आहे असे समजा. तसेच, डाळी किंवा कडधान्ये जर भेसळयुक्त असतील तर ते पाण्यात टाकल्यावर रंग सोडतात.
भेसळयुक्त मध कसे ओळखाल:
1) मधाचे काही थेंब पेपर किंवा पांढऱ्या कपड्यावर टाका. शुद्ध मध पेपर भिजवणार नाही आणि कपड्यावर डाग सोडणार नाही. भेसळ असलेले मध पेपर भिजवेल आणि कपड्यावर पिवळसर डाग सोडेल.
2) एक ग्लास पाण्यात जर एक चमचा मध टाकले तर शुद्ध मध ग्लासमध्ये तळाशी साचेल व अशुध्द मध पाण्यात विरघळेल.
3) थोडा कापूस मधात बुडवा आणि पेटवा. जर कापूस कुठलाही आवाज न करता पेटला तर मध शुद्ध आहे आणि जर कापूस तडतड आवाज करत पेटला तर त्यात भेसळ आहे.
अन्नातील भेसळ टाळण्यासाठी काही उपाय:
बाजारातून आणलेल्या पदार्थांमध्ये भेसळ ओळखता येणे हे खूप महत्वाचे आहे पण अश्या वस्तु खरेदी करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. म्हणून खरेदी करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तपासा:
खात्रीच्या दुकानातून खरेदी करा
गुणवत्ता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन चांगल्या ब्रँडचे खात्रीच्या दुकानातून खाद्यपदार्थ खरेदी करा. कुठूनही खरेदी करत असाल त्या ठिकाणी FSSAI (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया) सारखी प्रमाणपत्रे आहेत का हे तपासा कारण ही प्रमाणपत्रे प्रॉडक्टच्या सुरक्षा मानकांणाची पूर्तता केली आहे ह्याची खात्री करतात.
लेबल आणि पॅकेजिंग तपासा
आपण खरेदी करत असलेल्या पदार्थांमध्ये कोणतेही हानिकारक संरक्षके आहेत का हे तपासण्यासाठी पदार्थांच्या पॅक वरील घटकांची यादी नेहमी वाचा. खराब झालेले किंवा फाटलेले पॅक घेणे टाळा. खरेदी करत असताना तुम्ही अन्नपदार्थांच्या कालबाह्यता (एक्सपायरी) तारखा तपासून घ्या.
जंक फूड खाताना सावध रहा
बाहेरील पदार्थ खाताना फक्त स्वच्छताच नाही तर पदार्थांमधली भेसळ आहे का ह्याचे निरीक्षण करणे सुद्धा गरजेचे आहे. ह्या भेसळचे त्रास होऊ नये म्हणून समोर पदार्थ बनवणारे स्टॉल किंवा हॉटेल निवडा म्हणजे शिळे, भेसळयुक्त अन्न खावे लागणार नाही. बऱ्याचवेळा ह्या अन्नात रंग मिसळले जातात त्यामुळे नीट तपासून खाण्याचे ठिकाण निवडा.
तुमची जागरूकता वाढवा
सामान्य भेसळ आणि त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम याबद्दल सविस्तर माहिती घ्या. तुमच्या कुटुंबाला, विशेषत: मुलांना शुद्ध आणि सुरक्षित खाद्यपदार्थ सेवन करण्याच्या महत्त्वाबद्दल शिक्षित करा.
भेसळयुक्त पदार्थ ओळखण्याच्या पद्धती कोणत्या?
भेसळ ओळखण्यासाठी काही प्रमाणित पद्धती आहेत ज्या वापरुन पदार्थांची शुद्धता ठरवली जाते. परंतु यातील काही पद्धती फक्त प्रयोगशाळेत रसायने, उपकरणे वापरुन केल्या जातात.
ऑर्गनोलेप्टिक पद्धती
ह्या पद्धतीमध्ये बघणे, वास, स्पर्श आणि चव ह्यांचा उपयोग करून अन्नाची चाचणी केली जाते. उदाहरणार्थ, शुद्ध दुधाचे ओघळ पडतात जे बघून आपण त्याची गुणवत्ता ठरवू शकतो, भाज्यांचा रंग जातो हे बघू शकतो किंवा मधाची चव घेऊन त्याची भेसळ ओळखू शकतो. ह्या पद्धतीचा वापर बेकरी मधील पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, चहा, मसाले, मांस, कुठलाही ज्यूस, ई. मधील भेसळ ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो.
रासायनिक पद्धती
रासायनिक चाचण्यांमध्ये भेसळ शोधण्यासाठी अभिकर्मक (reagents) वापरले जाते. उदाहरणार्थ, दुधात स्टार्च शोधण्यासाठी आयोडीन टाकल्याने जर त्याचा रंग निळा झाला तर दुधात स्टार्च आहे हे सिद्ध होते. ही पद्धत प्रयोगशाळेत विविध रसायने आणि उपकरणे वापरुन वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी वापरली जाते.
क्रोमॅटोग्राफिक पद्धती
याचा वापर अधिक वेळा खाद्यपदार्थांमधील कृत्रिम रंग ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो. अनेकदा शेतात जी खते, कीटकनाशके वापरली जातात आणि अन्न प्रक्रिया करताना जी संरक्षके वापरली जातात ती ओळखण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर केला जातो.
स्पेक्ट्रोस्कोपिक पद्धती
इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये अन्नतील कीटकनाशकांसारख्या दूषित घटकांची उपस्थिती शोधण्यासाठी वापरले जाते.अल्ट्राव्हायोलेट विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये मायकोटॉक्सिन सारखे विषारी संयुगे ओळखण्यासाठी वापरले जाते जे सुकामेवा, तृणधान्य, मसाले ई. यांवर वापरले जाते. मास स्पेक्ट्रोमेट्रीचा उपयोग प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स यांसारख्या अन्न नमुन्यांमधील मिश्रित मिश्रणांचे हानिकारक घटक ओळखण्यासाठी आणि त्यांचे प्रमाण बघण्यासाठी केला जातो.न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनान्स स्पेक्ट्रोस्कोपी या पद्धतीचा वापर अन्नामध्ये जड धातूंसारखे दूषित घटक शोधले जातात.
सारांश
निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी आपण रोज खातो त्या अन्नाची शुद्धता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे. सामान्य भेसळ कोणत्या असतात आणि ते करणाऱ्यांबद्दल जागरूक राहून, घरच्या घरी साध्या चाचण्या करून तुम्ही भेसळयुक्त अन्न खाणे टाळू शकतात. काही उपाय करून आणि शिकून तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला संभाव्य आरोग्य धोक्यांपासून वाचवू शकता.
प्रश्नोत्तरे
भेसळयुक्त अन्न टाळण्यासाठी पॅकेटवर काय पहावे?
खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील अतिरक्त मिश्रित पदार्थ किंवा संरक्षक घटकांची यादी तपासा, कालबाह्यता तारीख बघा, पॅकेजिंग सीलबंद आहे का ते बघा .
भेसळयुक्त अन्न टाळणे महत्त्वाचे का आहे?
भेसळयुक्त अन्नामध्ये हानिकारक पदार्थ असतात ज्यामुळे विषबाधा, जठर व आतड्यांच्या समस्या आणि कर्करोगासारख्या दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उद्भवु शकतात.