फास्ट फूडचे मुलांच्या आरोग्यावर होणारे 7 घातक परिणाम

3998 1

फास्ट फूडचे मुलांच्या आरोग्यावर होणारे 7 घातक परिणाम

आजच्या वेगवान जगात, फास्ट फूड हा अनेक कुटुंबांच्या जीवनाचा एक सामान्य भाग बनला आहे. पालक व्यस्त दिनचर्येमूळे मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत आणि देता येईल तेवढ्या वेळेत मुलांचे फक्त हट्ट पुरवले जातात. हे हट्ट पुरवताना बाहेरील खाद्यपदार्थ किंवा रेडी टु कुक सारखे पदार्थ मुलांसाठी तसेच पालकांसाठी आकर्षक निवड बनत चालले आहेत. नकळत पालकांकडूनच मुलांना हट्ट पुरवण्याच्या नादात आहारच्या चुकीच्या सवयी लागतात ज्या आरोग्यावर आजीवन प्रभाव करू शकतात. मुलांसाठी लहानपणी आहार निवडताना काही खबरदारी घेतल्या गेल्या तर त्यांना चांगल्या सवयी लागून आरोग्यावर  होणारे गंभीर परिणाम टळू शकतात. आपल्या मुलांच्या निरोगी भवितव्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग पालकांनी दाखवणे काळाची गरज आहे.

   मुलांना योग्य पोषण मिळण्यासाठी जंक फूड का टाळले पाहिजे आणि पालकांनी मुलांसाठी नक्की कोणत्या प्रकारच्या आहाराची निवड केली पाहिजे, याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. जी तुम्हाला मुलांच्या आरोग्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकते. 

जंक फूड चे  मुलांवर कोणते हानिकारक  परिणाम होतात ?

1)  पौष्टिकतेची कमतरता

फास्ट फूड तसेच पॅकेज्ड फूड मध्ये  सामान्यत: कॅलरी जास्त असतात परंतु आवश्यक पोषक घटक कमी प्रमाणात असतात. मुलांची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध संतुलित आहार मिळणे आवश्यक असते. ह्या पदार्थांमध्ये अनेकदा कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे आणि इतर काही महत्त्वाच्या  पोषक घटकांची कमतरता असते, ज्यामुळे मुलाच्या शारीरिक विकास, हाडांचे आरोग्य, रोगप्रतिकार शक्ति ह्यावर परिणाम होऊ शकतो.

2) लठ्ठपणा आणि वजन वाढण्याच्या समस्या

मुलांमध्ये ह्या आहाराच्या सेवनाचा सर्वात तात्काळ परिणाम म्हणजे वजन वाढणे आणि लठ्ठपणा येणे. ह्या आहारात सामान्यत: अतिरिक्त फॅट्स, शुगर आणि कॅलरीज जास्त असतात. ह्या आरोग्यासाठी घातक असणाऱ्या घटकांमुळे कालांतराने वजन वाढू शकते आणि लठ्ठपणा येऊ शकतो. बालपणातील लठ्ठपणामुळे टाईप 2 मधुमेह, हृदयासंबंधी समस्या, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या आरोग्याच्या समस्या येऊ शकतात.

3) मानसिक आरोग्यावर परिणाम

ह्या पदार्थांमूळे केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की जे मुले फास्ट फूडचे वारंवार सेवन करतात त्यांना नैराश्य आणि चिंता होण्याची शक्यता असते. साखर आणि अतिरिक्त चरबीची उच्च पातळी मेंदूच्या कार्यावर परिणाम तर करतेच परंतु मुलांच्या सतत बदलणाऱ्या मूड मूळे त्यांच्यात वर्तणुकीशी संबंधित बदल आढळून येतात. शिवाय, अत्यावश्यक पोषक तत्वांचा अभाव मानसिक आरोग्याच्या विकारांना कारणीभूत ठरू शकतो ज्याचा परिणाम सर्वांगीण विकासावर होतो.

Side effect of junk food on body

4) शैक्षणिक विकासावर परिणाम

अश्या पदार्थांमध्ये जास्त साखर आणि अतिरिक्त तसेच घातक चरबी असल्याने मुलांमध्ये आळशीपणा, एकाग्रतेचा अभाव आणि थकवा ह्यांसारख्या समस्या वाढू लागतात. यामुळे शाळेमध्ये लक्ष केंद्रित करण्याच्या आणि चांगली कामगिरी करण्याच्या मुलाच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतात. याव्यतिरिक्त, मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण पोषक तत्वांचा अभाव शैक्षणिक यश आणि बौद्धिक क्षमतेवर गंभीर आघात करू शकते.

5) पचनाच्या समस्या

रेडिमेड तसेच साठवलेल्या अन्नात फायबरचे प्रमाण कमी असते, जे निरोगी पचनासाठी आवश्यक असते. फायबर नसलेल्या आहारामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. शिवाय, ह्या पदार्थांमधील उच्च चरबीयुक्त सामग्रीमुळे पचन क्रियेवर परिणाम होतो आणि ऍसिड रिफ्लक्स सारख्या परिस्थितीची लक्षणे वाढू शकतात. जी मुले ह्या आहाराचे वारंवार सेवन करतात त्यांची पचनशक्ती खराब होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या एकूण आरोग्यावर आणि गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

6) गंभीर आजारांचा धोका

फास्ट फूडचे नियमित सेवन केल्याने तरुण वयात गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. यातील अस्वास्थ्यकर घटकांमुळे टाइप-2 मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजार होऊ शकतात. एकेकाळी लहान मुलांमध्ये दुर्मिळ समजले जाणारे हे आजार आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे वाढू लागले आहेत. जुनाट आजारांचे मुलाच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनशैली आणि आयुर्मानावर प्रभाव होताना दिसून येत आहे.

7) खाण्याच्या चुकीच्या सवयी

बऱ्याचदा मुलं अत्यंत रुचकर आणि सहज उपलब्ध होणाऱ्या ह्या पदार्थांच्या व्यसनाधीन होऊन त्यांना त्याची जास्त ओढ लागते आणि ते निरोगी आहाराचं महत्वच लक्षात घेत नाहीत. यामुळे पौष्टिक जेवणापेक्षा जंक फूडला प्राधान्य देऊन लहान मूले त्यालाच आरोग्यदायी आहार मानू लागतात. लहान वयात खाण्याच्या चुकीच्या सवयी लागण्याने त्या मोडणे कठीण होते आणि त्या प्रौढत्वापर्यंत टिकून राहू शकतात, ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

सारांश:

फास्ट फूड हा एक सोयीचा पर्याय असला तरी मुलांच्या आरोग्यावर होणारे त्याचे हानिकारक परिणाम दुर्लक्षित करता येणार नाहीत. पौष्टिकतेची कमतरता आणि लठ्ठपणापासून ते मानसिक आरोग्याच्या समस्या आणि जुनाट आजारांपर्यंत, सगळे नकारात्मक परिणाम गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारे आहेत. मुलांच्या खाण्याच्या सवयी आणि एकूणच आरोग्य घडवण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. मुलांचे शाररिक आणि मानसिक आरोग्य जपणे अत्यंत महत्वाचे आहे.आरोग्यदायी निवडी करून आणि संतुलित आहाराला प्रोत्साहन देऊन, पालक त्यांच्या मुलांना निरोगी, आनंदी तारुण्य घालवण्यास मदत करू शकतात. पौष्टिक पदार्थांना प्राधान्य देऊन आणि घातक पदार्थांचे सेवन मर्यादित करून मुलाच्या जीवनात लक्षणीय बदल घडू शकतात ज्यामुळे त्यांचे आरोग्य वर्तमान व भविष्यात निरोगी राहण्यास मदत होते.

फास्ट फूड खाणे कसे टाळू शकतो?

फास्ट फूडऐवजी घरी बनवलेला संतुलित आहार निवडा, त्या आहाराला अजून पौष्टिक व चवदार कसे बनावता येईल ह्यावर लक्ष द्या. कुटुंबात सगळ्यांनी खाण्याच्या सवयीत बदल करून एकत्र आहाराचे नियोजन करणे, जेवण बनवणे, जेवणे ह्यासारख्या गोष्टी करून एकमेकांना प्रोत्साहित करून ह्या पदार्थांच्या मोहातून बाहेर पडू शकतात. 

फास्ट फूड खाल्ल्यानंतर काय करावे?

बाहेरील खाद्य पदार्थ शक्यतो टाळले पाहिजेत पर्याय म्हणून तुम्ही सोबत जास्त काळ टिकणारे पदार्थ आणि फळे  आणि काही एनर्जि देणारे पदार्थ ठेवले पाहिजेत. पण, पर्याय नसताना तुम्हाला काही बाहेरील पॅकेज्ड फूड खावे लागले तर भरपूर पाणी पिऊन शरीराला हायड्रेट करणे तसेच शारीरिक हालचाली ठेवणे आवश्यक आहे.

One thought on “फास्ट फूडचे मुलांच्या आरोग्यावर होणारे 7 घातक परिणाम

  1. Nowadays children are more fond of eating fast food.But the side effects of this have been presented to them in a very good way from this reading.good information👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top