आत्ताच्या काळात डिप्रेशन म्हणजेच नैराश्य हा सामान्य मानसिक विकार आहे. ज्यामुळे जगभरातील असंख्य लोक त्रासले आहेत. ह्या विकाराचा पूर्ण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, व्यक्तीच्या भावना, विचार तसेच शारीरिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. परंतु त्याबद्दल सखोल माहिती व जागरूकता अजूनही लोकांपर्यंत पोहचली नाही म्हणून त्याचे वेळेत निदान व उपचार ह्या दोन्ही गोष्टी करणे शक्य होत नाही. ह्या ब्लॉग मध्ये आपण नैराश्याची लक्षणे, कारणे, प्रकार, स्थिती ओळखणे आणि उपचार कसे करावे हे जाणून घेणार आहोत.
डिप्रेशन म्हणजे काय?
नैराश्य(डिप्रेशन) किंवा प्रमुख नैराश्यग्रस्त विकार (मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर) ही एक गंभीर वैद्यकीय आजाराची स्थिती आहे. ज्यात तुमच्या भावना, विचार पद्धती आणि कृतीवर नकारात्मक परिणाम होतात. ह्या स्थितीत विविध प्रकारच्या भावनिक आणि शारीरिक समस्या उद्द्भवू शकतात, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतात. नैराश्य म्हणजे फक्त दुःखी वाटणे किंवा मानसिकरीत्या खचणे नव्हे तर प्रत्येक कामातून आवड निघून जाते आणि उदासीनता वाढते.
नैराश्य हा फक्त एक मानसिक आजार आहे असा समज चुकीचा आहे कारण त्याचे शाररिक परिणाम देखील जाणवतात. त्रस्त व्यक्तीला निर्णय क्षमता कमी होते, एकाग्र होण्यास अडथळे येतात, झोपेच्या पद्धतीत बदलतात, अचानकच वजन कमी किंवा जास्त होते, भूक लागत नाही किंवा भुकेवर नियंत्रण राहत नाही, अस्वस्थता वाटते तसेच चिडचिडेपणा होणे असे त्रास जाणवतात. ह्यापैकी काही त्रास जर दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ जाणवले तर नैराश्य आहे ओळखून लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेणे गरजेचे ठरते.
नैराश्यची लक्षणे कोणती?
ही लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकतात परंतु आपल्याला सामान्य लक्षणे माहिती पाहिजेत व ओळखता येणे आवश्यक आहेत:
- सतत दुःख, निराशा किंवा एकटेपणाची भावना.
- अनेक आवडणाऱ्या रोजच्या गोष्टींमधून आनंद किंवा स्वारस्य गमावणे.
- योग्य आहार घेत असताना सुद्धा अचानक व भरपूर वजन वाढणे किंवा कमी होणे.
- निद्रानाश होणे किंवा जास्त झोप येणे.
- सतत थकवा जाणवणे आणि शरीरात ऊर्जा कमी पडणे.
- अपराधीपणाची तीव्र भावना किंवा अस्वस्थता वाटणे.
- लक्ष केंद्रित करण्यात, लक्षात ठेवण्यास किंवा निर्णय घेण्यात अडचण वाटणे किंवा आत्मविश्वास कमी वाटणे.
- पचनाच्या समस्या, तीव्र डोकेदुखी.
- वारंवार आत्महत्येचे विचार येणे.
नैराश्य कसे ओळखायचे?
नैराश्य ओळखता येण म्हणजे मदत मिळवण्याच्या दिशेने पहिल पाऊल टाकणे म्हणूनच आपल्याला ही प्रमुख लक्षणे माहिती पाहिजेत:
- वरील लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ दिसून येणे.
- लक्षणे जाणवून दैनंदिन रुटीनमध्ये व्यत्यय येणे.
- वर्तणुकीत अचानक बदल होणे, कामातला आनंद कमी वाटणे, तसेच सतत नकारात्मक विचार येणे.
- निरोगी असताना शारीरिक व्याधींच्या वारंवार तक्रारी वाटणे.
- आत्मविश्वास कमी वाटणे आणि अंतर्मुख होणे.
- एकटेपणा जाणवून कुटुंबातील व्यक्तींपासून दूर जाणे किंवा सतत दुखावले जाणे.

डिप्रेशनची कारणे–
डिप्रेशनची करणे वेगवेगळी असू शकतात त्यापैकी काही खाली दिली आहेत:
- नैराश्याचा कौटुंबिक इतिहासामुळे म्हणजेच आनुवंशिकतेने धोका वाढवू शकतो.
- आपल्या मेंदूतील रासायनिक असंतुलन या त्रासासाठी कारणीभूत ठरू शकते.
- सभोवतालचे बदल व जीवनातील तणाव डिप्रेशनची करणे ठरू शकतात.
- मानसिक स्थिति आणि कौटुंबिक तणावपूर्ण घटना, आर्थिक समस्या, शालेय ताणतणाव नैराश्याला कारणीभूत ठरू शकतात.
- कुटुंबातील सदस्यांचे गैरवर्तणूक म्हणजे संताप, भांडण, अति कडक शिस्त, सतत आणला जाणार दबाव या गोष्टींमुळे सुद्धा उदासीनता वाटू शकते.
- आजकालच्या सोशल मीडियाच्या माध्यमांमुळे होणारे त्रास जसे की एकमेकाला त्रास देणे, स्वतःची तुलना करून वाईट वाटून घेणे, मनाला वाईट वाटेल असे कंटेंट बघणे ह्यामुळे सुद्धा विचार वाढून नैराश्य येऊ शकते.
नैराश्यचे प्रकार :
- मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर (एमडीडी): नेहमी दुःखी आणि निरस राहणे.
- पर्सिस्टंट डिप्रेसिव्ह डिसऑर्डर (डिस्टिमिया): कमी प्रभावशाली परंतु दीर्घकाळ टिकणारे लक्षणे जाणवणारे डिप्रेशन.
- बायपोलर डिसऑर्डर: खूप जास्त नैराश्य वाटणे आणि वेडसर वागणे.
- सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर (एसएडी): विशिष्ट ऋतूंमध्ये उद्भवणारे डिप्रेशन.
- पोस्टपर्टम डिप्रेशन: बाळंतपणानंतर येणारे डिप्रेशन.
- मानसिक डिप्रेशन: मनोविकृतीसह येणारे तीव्र डिप्रेशन.
नैराश्याचा उपचार कसा करायचा?
नैराश्याच्या प्रभावी उपचारांमध्ये अनेक पध्दतींचा समावेश आहे त्यापैकी काही पद्धती:
- औषधोपचार: निराशा अवरोधक (एन्टीडिप्रेसेंट्स) औषधे मूडवर परिणाम करणारी मेंदूतील रसायने संतुलित करण्यास मदत करतात. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली पाहिजेत आणि त्याचे कुठलेही दुष्परिणाम आढळल्यास डॉक्टरांशी चर्चा करणे महत्त्वाचे आहे.
- मानसोपचार: मानसिक आरोग्य तज्ञांशी तुमच्या स्थिती आणि संबंधित समस्यांवर चर्चा करणे नैराश्याच्या उपचारांमध्ये सगळ्यात उत्तम पर्याय असू शकतो. वेगवेगळे सेशन घेऊन त्यावर चर्चा करून तज्ञ योग्य उपचार करून तुम्हाला निरोगी होण्यास मदत करू शकतात.
- जीवनशैली बदल: धावपळीच्या रुटीन मध्ये नियमित व्यायाम करणे, सकस व उत्तम आहार घेणे आणि नियमित पुरेशी झोप घेणे तुम्हाला डिप्रेशन पासून दूर ठेवू शकते.
- प्रोत्साहित राहणे: विविध खेळ खेळणे, ट्रीप प्लॅन करणे, आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवणे, छंद जोपासणे, छान पुस्तके वाचने, लिहिणे किंवा इतर आवडत्या कामात वेळ घालवून स्वतःला फ्रेश आणि प्रोत्साहित ठेवणे म्हणजेच नैराश्याचा प्रभावीपणे उपचार करणे.
- मेडिटेशन: ध्यान केल्याने तणाव कमी होऊन मूड सुधारण्यास मदत होऊ शकते.
सारांश
हा गंभीर पण उपचार करण्यायोग्य विकार आहे ज्याची लक्षणे समजून घेणे, ओळखणे आणि योग्य उपचार घेऊन त्यातून बरे होणे शक्य आहे. म्हणून घाबरून न जाता तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेऊन त्यावर लवकर उपचार करणे हे महत्वाचे ठरते. ही स्थिति आपल्यावर व आपल्या जवळच्या व्यक्तींवर येऊ नये ह्यासाठी आरोग्यदायी दिनचर्या पाळली पाहिजे, आपल्या मानसिक स्थितीकडे आणि नकारात्मक विचारचक्रावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे म्हणून सतर्कतेने आजारांचे निरीक्षण करून लक्षणे ओळखली पाहिजेत. तसेच कुठल्याही ऐकलेल्या किंवा वाचलेल्या उपायांवर विश्वास ठेवण्यात वेळ घालवणे धोक्याचे ठरू शकते म्हणून शक्य होईल तेवढया लवकर डॉक्टरांची मदत घेणे फायद्याचे ठरेल.
प्रश्नोत्तरे
लहान मुलांना डिप्रेशन येते का?
होय. लहानमुलांना डिप्रेशन येते. शारीरिक आरोग्य, शालेय तणाव, जीवनातील घटना, अनुवंशिकता, सभोवतालचे वातावरण आणि मेंदूतील रासायनिक चढ उतार ह्या घटकांमुळे मुलांना नैराश्य येऊ शकते. पालक मुलांच्या स्थितीनुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करू शकतात.
वेळेत उपचार न घेतल्याने कुठले धोके होऊ शकतात?
योग्य वेळी उपचार न केल्याने डिप्रेशन दीर्घकाळ किंवा अति गंभीर होऊ शकते तसेच आत्महत्येचा धोका वाढू शकतो. नैराश्यामुळे अल्कोहोल किंवा इतर नशेच्या पदार्थांच्या सेवनाची सवय वाढू शकते, तसेच इतर आरोग्याच्या समस्या जसे की मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि अनेक दीर्घकालीन वैद्यकीय आजार वाढू शकतात.