डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव कसा कराल?

Mosquito borne diseases- arogyamdhansampda

डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव कसा कराल?

डासांमुळे होणारे आजार हे जगभरातील आरोग्याच्या चिंतेचा विषय आहे, विशेषतः पावसाळ्यातील त्यांचा प्रादुर्भाव लक्षात घेता विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते. संसर्गजन्य आजारांची साथ असताना निरोगी राहण्यासाठी म्हणजेच मलेरिया, डेंग्यू, झिका, चिकनगुनिया यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला डासांपासून कोणते आजार होतात, त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा आणि कोणती काळजी घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.

डासांमुळे होणारे आजार कोणते?

डास विविध संसर्गजन्य रोगांचा प्रसार करतात. जेव्हा ते चावतात तेव्हा अनेक विषाणू आणि परजीवी यांसारख्या रोगजनकांना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित करू शकतात. येथे डासांमुळे होणाऱ्या काही सर्वात सामान्य रोगांची माहिती देत आहोत:

मलेरिया: हा आजार ॲनोफिलीस(Anopheles) डासाने प्लास्मोडियम परजीवीचा(Plasmodium parasites) प्रसार केल्यामुळे होतो आणि ह्याच्या लक्षणांमध्ये ताप येणे, थंडी वाजणे आणि फ्लू सारखा त्रास होणे यांचा समावेश होतो.

डेंग्यू: हा आजार संक्रमित एडिस ह्या डासाने प्रसारित होतो ज्यामध्ये खूप ताप, तीव्र डोकेदुखी, सांधे आणि स्नायू दुखणे, पुरळ येणे आणि उलटी तथा मळमळ होणे ही लक्षणे दिसून येतात.

झिका विषाणू: हा आजार संक्रमित असलेल्या एडिस डासांद्वारे पसरतो ज्यामध्ये ताप येणे, पुरळ येणे, सांधेदुखी आणि डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाची जळजळ होणे ही लक्षणे दिसून येतात.

चिकनगुनिया: हा आजार एडिस इजिप्‍टी ह्या डासाने अरबो व्हायरस प्रसारित केल्यामुळे होतो त्यात अचानक ताप येणे, सांधे आणि स्नायू दुखणे, पुरळ, डोकेदुखी, मळमळ आणि थकवा वाटणे ही लक्षणे दिसतात.

डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी संरक्षक उपाय कोणते?

मच्छर प्रतिबंधके (मॉस्किटो रिपेलेंट्स) वापरा
डास चावण्यापासून वाचायचे असेल तर मच्छर प्रतिबंधके म्हणजेच घरात लिक्विड वापरुन चालणारे मशीन वापरणे, अंगाला काही क्रीम, स्प्रे तसेच जेल लावणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. हे निवडताना त्यात डीईईटी, पिकारिडिन किंवा लिंबू आणि निलगिरीचे तेल असलेले रिपेलेंट निवडा म्हणजे त्वरित फायदा होईल. त्यावर लिहिलेल्या सूचनांचे पालन करून ते त्वचेवर आणि कपड्यांवर लावा.

संरक्षक कपडे घाला

विशेषत: पहाटे आणि संध्याकाळी डासांचे प्रमाण जास्त असते म्हणून जर तुम्ही ह्या वेळेत घराबाहेर पडत आहात तर विशेष काळजी घ्या. पूर्ण कपडे घाला आणि शरीर झाकून ठेवा म्हणजे डास चावण्याचा धोका कमी होतो. घराबाहेर पडताना लांब बाही असलेले शर्ट किंवा टीशर्ट, लांब पँट घाला, मोजे आणि शूज घाला म्हणजे तुमचा चांगला बचाव होईल.

बारीक जाळी लावून  घ्या

डासांना तुमच्या घरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी खिडकी आणि दरवाज्यावर बारीक जाळी लाऊन घ्या म्हणजे हवा येईल पण डास रोखले जातील. झोपताना मच्छरदाणी लावा, विशेषतः मलेरिया सारख्या आजारांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात अतिरिक्त संरक्षण वापरणे नेहमीच फायद्याचे ठरते.

पाणी साचु देऊ नका

साचलेल्या पाण्यात डास अंडी घालतात ज्यामुळे त्यांची संख्या वाढते म्हणून घरातील फ्लॉवर पॉट्स, शोभेचे फाऊंटेनस्, उघडे असलेले फिश टॅंक, एसी आणि फ्रीज चे साठलेले पाणी नियमितपणे स्वच्छ करा. तसेच घराजवळील गटार, टाकून दिलेले टायर किंवा इतर पाणी साचेल अश्या वस्तु काढून टाका तसेच घरात कुठे पाइप गळतोय  का हे नक्की बघा कारण तिथे सुद्धा डास अंडी घालू शकतात. ह्या स्वच्छतेने डासांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. 

स्वच्छता राखा

तुमचा घराजवळील परिसर स्वच्छ ठेवा आणि कचरा साठू देऊ नका म्हणजे डासांची उत्पत्ति होणारी ठिकाणे कमी होण्यास मदत होऊ शकते. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा, पाण्याच्या टाक्या झाकून ठेवा, आणि आपल्या परिसरात डासांसाठी फवारणी करून घ्या.

इतर उपाय

मच्छर जास्त प्रमाणात झाले असतील तर घरात मॉस्किटो कॉईल लावा, इलेक्ट्रिक बॅट, मशीन च्या मदतीने डास पळवू शकता. तसेच घरात व घराबाहेर कडूलिंबाच्या पानांचा व इतर आयुर्वेदिक घटक असलेले धूप, उदबत्त्या जाळून धूर करू शकता म्हणजे डास व इतर कीटक कमी होण्यास मदत होते. परंतु हे उपाय करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे जेणेकरून कुठल्याही एलर्जि व इन्फेक्शन पासून तुम्ही वाचू शकता.

आपापसातील संसर्गापासून वाचा

संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी फक्त बाहेरच नाही तर घरात देखील काळजी घेतली पाहिजे म्हणजे जर घरात कोणाला संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्ती पासून शक्य होईल तेवढे अंतर पाळा, सर्दी व तापात वापरलेले कपडे निर्जंतुकीकरण होईल अश्या पाण्यात(डेटॉल मिसळलेल्या) भिजवून धुवा त्यामुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही आणि लहान मुलं , वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांची विशेष काळजी घ्या. 

संक्रमित डासांपासून होणारे त्रास रोखण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे?

घरात असताना, प्रवासात असताना कितीही खबरदारी घेतली तरी पूर्णपणे आपण स्वतःचा डासांपासून बचाव करू शकत नाही म्हणून काही काळजी घेतल्या पाहिजेत.

लसीकरण आणि औषधोपचार: डासांपासून संसर्ग होणाऱ्या काही आजारांवर जसे की मलेरिया वर लस आणि प्रतिबंधात्मक औषधे उपलब्ध आहेत ती तुम्ही घेतली पाहिजे.  सावधगिरी म्हणून त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.

दुर्लक्ष टाळणे: अतिगंभीर त्रास टाळण्यासाठी डासांमुळे होणाऱ्या रोगांचे त्वरित निदान आणि उपचार करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थकवा, मळमळ किंवा डास चावल्यानंतर पुरळ यांसारखी लक्षणे जाणवत असली तर दुर्लक्ष न करता ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.

जागरूकता वाढवणे: स्वतःला आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना डासांपासून पसरणारे रोग आणि त्याबद्दल प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल शिक्षित करणे आवश्यक आहे. म्हणून सामुदायिकपणे एकत्र येऊन डास कमी करण्यासाठी जागरूकता वाढवू शकता ज्याची सगळ्यांनाच मदत होईल.

परफ्यूम लावणे टाळा: काही सुगंधी अत्तरे तसेच लॅक्टिक ऍसिड असलेले सौंदर्यप्रसाधणे डासांना तुमच्याकडे आकर्षित करू शकतात. डास चावण्याचा धोका कमी करण्यासाठी घराबाहेर पडताना त्यांचा वापर टाळा. 

डास जास्त कोणाला चावतात?

डास नवजात बाळ, लहान मुलं, तरुण, प्रौढ आणि वयस्कर व्यक्ती कोणालाही चावू शकतात. आपण श्वसना दरम्यान जेव्हा कार्बन डायऑक्साइड सोडतो तेव्हा डास 50 मीटर एवढ्या अंतरावरून आपल्याला शोधून काढतात आणि चावतात. परंतु काही लोकांवर डासांचा जास्त हल्ला होण्याची शक्यता असते. तुम्ही जर खालील वर्गात येत असाल तर जास्त सावधगिरी पाळली पाहिजे. डास विशेषतः अशा लोकांकडे आकर्षित होतात  

  • ज्यांच्या शरीरात जास्त लॅक्टिक ऍसिड तयार होते.
  • ज्यांचा रक्तगट  O असतो.
  • लठ्ठ व्यक्ती आणि उच्च चयापचय असलेल्या गर्भवती महिला.
  • ज्यांनी मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम केले असेल.

सारांश

डासांमूळे होणा-या रोगांपासून स्वतःचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे त्यासाठी वैयक्तिक प्रतिबंधात्मक उपाय, आरोग्य सेवा पद्धती आणि सामुदायिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या मार्ग वापरुन आणि खबरदारी घेऊन, तुम्ही डास चावण्याचा धोका आणि पसरणारे रोग बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता. म्हणून जागरुक रहा आणि डासांपासून होणा-या रोगांपासून तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत रहा.

प्रश्नोत्तरे

स्वच्छ पाणी साठवलेल्या जागी सुद्धा डास होऊ शकतात का?

हो. फक्त सांडपाण्यातच नाही तर आपण रोज वापरासाठी साठवलेल्या पाण्यात सुद्धा डासांची उत्पत्ति होऊ शकते. म्हणून, जिथे कुठे तुम्ही पाणी साठवत असाल ते व्यवस्थित झाकून ठेवा, वेळोवेळी स्वच्छ करा आणि काही वेळासाठी ते भांडे कोरडे ठेवा.

मच्छर प्रतिबंधके  वापरल्याने काही त्रास होऊ शकतो का?

ह्या प्रतिबंधकांचा सहसा काहीही त्रास म्हणजेच एलर्जि होत नाही परंतु तुम्हाला ते लावल्या नंतर जर काही त्रास जसे की आग होणे, पुरळ येणे, त्वचा लाल होणे असे जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top