आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे पण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात झोपल्याचे अनेक शाररिक दुष्परिणाम होतात. आपण अनेकदा झोपेच्या कमतरतेच्या धोक्यांबद्दल ऐकतो आणि बोलतो परंतु जास्त झोपणे देखील हानिकारक ठरू शकते. जास्त झोपणे म्हणजेच ओव्हरस्लीपिंग ही गंभीर वैद्यकीय स्थिती मानली जाते ज्याचे अनेक दुष्परिणाम देखील दिसून येतात पण त्यातून बरे होण्यासाठी अनेक उपाय आहेत आणि वैद्यकीय उपचार सुद्धा आहेत. या ब्लॉगमध्ये, आपण ओव्हरस्लीपिंग म्हणजे नेमक काय, त्याचे दुष्परिणाम, आणि त्यावर सहज करता येणारे उपाय काय हे जाणून घेऊ.
ओव्हरस्लीपिंग म्हणजे काय?-
24 तासांच्या कालावधीत नऊ तासांपेक्षा जास्त झोप घेणे म्हणजे ओव्हरस्लीपिंग असू शकते ज्याला हायपरसोमनिया देखील म्हणतात. झोपेची गरज व्यक्तीनुसार बदलू शकते परंतु वैद्यकीय दृष्ट्या प्रौढांना प्रत्येक रात्रीत सात ते नऊ तासांच्या दरम्यान झोप घेणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही नियमितपणे सात ते नऊ तासाच्या वर झोप घेता तेव्हा त्याचे दुष्परिणाम म्हणजेच विविध आरोग्य समस्या उद्द्भवू शकतात.
शरीरात जर व्हिटामिन डी ची कमतरता असेल तर थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो आणि जास्त झोप येते तसेच व्हिटामिन बी 12 च्या कमतरतेमूळे सुद्धा जास्त झोपेच्या समस्या होऊ शकतात.
जास्त तास झोपेचे दुष्परिणाम?
प्रत्येक व्यक्तीनुसार जास्त झोपेचे गंभीर परिणाम वेगवेगळे असू शकतात. आपल्या दैनंदिन जीवनात काही चांगले बदल केल्याने कमी होऊ शकतात.
थकवा येणे-
जास्त झोपेमुळे दिवसभर थकवा जाणवतो ज्यामुळे ऊर्जा कमी वाटते, कामातील एकाग्रता कमी होते, निस्तेजपणा आणि उदासीनता वाटते. अति प्रमाणात झोप घेतल्याने तुम्हाला अस्वस्थता आणि सुस्तपणा वाटू शकतो. ह्या परिणामांमुळे तुमचा दैनंदिन कामांवर, हालचालींवर प्रभाव पडून तुम्हाला शारीरिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

डोकेदुखी-
जास्त झोप घेणाऱ्या लोकांमध्ये डोकेदुखी हा त्रास सामान्य असतो. विशेषत: जर तुम्ही झोपताना स्वच्छता राखत नसाल किंवा विचित्र स्थितीत झोपत असाल तर डोकेदुखी अति प्रमाणात होऊ शकते परिणामी चिडचिड होणे, आजारपण वाटणे, लक्ष केंद्रित न होणे असे अनेक त्रास वाढू शकतात. अनियंत्रित झोपेमुळे मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरच्या पातळीतही बदल होऊ शकतात. जास्त वेळ झोपल्याने डिहायड्रेशन सुद्धा होऊ शकते.
पाठदुखी-
अतिवेळ झोपण्यामुळे सतत पाठदुखी होऊ शकते ज्यामुळे स्नायूंमध्ये निष्क्रियता, सांधे दुखणे तसेच सांधे आखडल्यासारखे वाटणे हे त्रास होऊ शकतात. जास्त वेळ पडून राहिल्याने अस्वस्थता, आळस तसेच इतर अवयवांचे दुखणे वाढते. झोपताना आरामदायक गादी वापरणे हा पाठदुखी पासून वाचण्यासाठी चांगला उपाय ठरू शकतो.
लठ्ठपणा-
जास्त झोपल्याने शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त विश्रांती मिळते आणि जी ऊर्जा विविध प्रकारची कामे करण्यासाठी वापरली जात नाही ती चरबी बनून शरीरात साठते. ह्यामुळे लठ्ठपणा येतो. तसेच, झोपेच्या चक्रातील व्यत्ययामुळे भूक नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकांवर परिणाम होऊन भूक अधिक लागते ज्यामुळे जास्त खाणे होते आणि वजन वाढते.
मधुमेह –
अभ्यासातून असे निदर्शनात येते की ओव्हरस्लीपिंग हे टाइप 2 मधुमेह होण्याचे प्रमुख करणांपैकी एक आहे. शरीराची हालचाल कमी झाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते, इन्सुलिन संवेदनशीलता आणि चयापचयावर गंभीर परिणाम होतात म्हणून जास्त झोपणाऱ्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.
हृदयरोग-
जास्त झोपेमुळे शरीरावर होणाऱ्या गंभीर परिणामांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या उद्द्भवण्याची जोखीम वाढू शकते.
नैराश्य-
उदासीनता आणि चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या ओव्हरस्लीपिंगमुळे निर्माण होऊ शकतात. गरजेपेक्षा जास्त वेळ झोप घेतल्याने थकवा जाणवतो ज्यामुळे मन प्रसन्न वाटत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजेच नैराश्य जाणवते जी कायमस्वरूपी आरोग्य समस्या बनू शकते.
नकारात्मकता-
स्मरणशक्ती कमी होणे, लक्ष केंद्रित करण्यास व्यत्यय येणे आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे हे गरजेपेक्षा जास्त झोपण्याचे दुष्परिणाम आहेत. झोपेची अनियमित पद्धत शरीराच्या अंतर्गत चक्रात व्यत्यय आणू शकते ज्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास होऊन नकारात्मकता वाढू शकते.
योग्य प्रमाणात विश्रांतीच्या किंवा झोपेच्या सवयी लावण्यासाठी काय केले पाहिजे?
चांगली आणि पुरेशी झोप शरीराला आणि मनाला निरोगी ठेवते परंतु अति प्रमाणातील झोप दोन्हींवर परिणाम करते. म्हणूनच झोपेची गुणवत्ता व वेळ सुनिश्चित करणे फायद्याचे ठरू शकते. त्यासाठी खालील काही उपाय केले पाहिजेत:
झोपेची वेळ
दररोज एकाच वेळी झोपा आणि उठा ज्यामुळे झोपेचे चक्र तयार होईल आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. रात्रीचे जागरण टाळून निसर्गचक्रानुसार वेळेतच झोपा त्यामुळे उशिरापर्यंत झोप घेणे ही सवय आपोआप बदलते.
अनुकूल वातावरण
झोपेच्या चांगल्या स्थितीसाठी तुम्ही झोपता ती खोली हवेशीर असणे, आरामदायी गादी असणे, शांतता असणे तसेच झोपण्यायोग्य वातावरण असणे गरजेचे ठरते.
वामकुक्षी –
तुम्हाला दुपारी डुलकी घ्यायची सवय असेल तर ती 20-30 मिनिटांच्या वर नसावी ज्यामुळे रात्री वेळेत झोप येऊन इतर त्रास वाढणार नाहीत.
शाररिक हालचाल
नियमित शारीरिक हालचाली तुमच्या झोपेचे नियमन करण्यास महत्वाच्या ठरू शकतात. दिवसभरात कमीतकमी 30 मिनिटे व्यायाम करणे, चालणे व इतर हालचाली ठेवल्यास शरीर थकल्यामुळे, ऊर्जा खर्च झाल्यामुळे शांत झोप येऊ शकते.
योग्य आहार
झोपण्यापूर्वी जड जेवण, त्रासदायक पेय जसे की अल्कोहोल टाळा. हे तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि झोपेची गुणवत्ता कमी करू शकतात.
सारांश
आपल्या शरीराला झोपेची मर्यादित गरज असते परंतु ही गरज ओलांडल्याने झोपेचे नैसर्गिक चक्र बिघडून त्रास होऊ शकतो. झोपेची गुणवत्ता कमी झाल्याने सुद्धा जास्त झोपण्याची सवय लागू शकते. ओव्हरस्लीपिंगच्या त्रासाचे सगळे घातक परिणाम टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. पण, पुरेशी झोप घेऊन सुद्धा तुम्हाला सतत थकल्यासारखे जाणवत असेल आणि झोप येत असेल तर तुम्हाला वैद्यकीय सल्ला घेणे फायद्याचे ठरू शकते.
प्रश्नोत्तरे
जास्त झोपेमूळे होणाऱ्या डोकेदुखीसाठी काय उपाय आहे?
हायड्रेटेड रहा म्हणजेच पुरेसे पाणी प्या, तणाव टाळा, पुरेसा वेळ शांत व अखंड झोप होईल ह्यासाठी प्रयत्न करा, आणि अति त्रासातून मुक्त होण्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्या.
जास्त झोपेपासून मुक्त कसे होऊ शकतो?
झोपेचे योग्य वेळापत्रक तयार करून ते काटेकोरपणे पाळा, योग्य आहार घ्या, नियमित व्यायाम करा, शारीरिक हालचाली ठेवा, झोपण्याच्या ठिकाणी चांगले वातावरण ठेवा, आणि झोपण्याच्या वेळी मोबाइल ,टीव्ही बघणे टाळा. हे उपाय करून सुद्धा तुम्हाला जास्त झोप येत असेल तर तज्ञांची मदत घ्या.