उष्माघाताची लक्षणे आणि त्यावरील त्वरीत उपाय

2149456738 1

उष्माघाताची लक्षणे आणि त्यावरील त्वरीत उपाय

उष्माघात म्हणजे काय ?

उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उध्दभवणारा  चिंताजनक असा उष्माघात हा आजार आहे, ज्याला हिटस्ट्रोक किंवा सनस्ट्रोक असेही म्हणतात. ज्यात शरीर नैसर्गिक पद्धतीने स्वतःचे तापमान नियंत्रित  करू शकत नाही. ज्यावेळी शरीराचे तापमान 104°F (40°C) पेक्षा जास्त असते. त्यावेळी शरीराची  घाम येण्याची यंत्रणा निकामी होते , त्यामुळे काहीवेळा गंभीर आणि जीवघेणी स्थिती निर्माण होते अचानक होणाऱ्या या आजारात आरोग्याच्या अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात, त्वरीत उपचार न घेतल्यामुळे हृदय, मूत्रपिंड, मेंदू, आणि स्नायूंवर गंभीर परिणाम होऊ शकतात. मृत्यू सुद्धा येऊ शकतो . याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

उष्माघाताची 8 लक्षणे :

वेळेवर उपचार घेण्यासाठी उष्माघाताची लक्षणे ओळखणे अधिक महत्वाचे आहे. सावधगिरी बाळगण्यासाठी तुम्हाला खालील सामान्य लक्षणे माहिती असायला हवेत:

  1. शरीराचे तापमान 104°F (40°C) किंवा त्याहून अधिक असणे.
  2. मानसिक स्थितीत बदल जसे की गोंधळ होणे, अस्पष्ट बोलणे, चिडचिड होणे किंवा चक्कर येणे.
  3. मळमळ जाणवणे किंवा उलट्या होणे.
  4. शरीराचे तापमान वाढल्याने त्वचा लाल होणे.
  5. उच्च तापमानामुळे त्वचा कोरडी पडणे.
  6. हृदयाची गती वाढू वाढणे आणि श्वासोच्छ्वास जलद होणे.
  7. तीव्र डोकेदुखी, डोके हलके वाटणे आणि चक्कर येणे
  8. स्नायूंना कमकुवतपणा येणे किंवा वेदनादायक पेटके  येणे.

Heat stroke

उष्माघात होण्याची कारणे कोणती?

उष्माघात अनेक कारणांमुळे होऊ शकतो त्यातील काही प्रामुख्याने आढळणारी करणे येथे देत आहोत:

  • दीर्घकाळ गरम हवामानात म्हणजेच उष्णतेच्या लाटांमध्ये राहणे.
  • गरम हवामानात अति शारीरिक श्रम करणे किंवा अति व्यायाम करणे.
  • शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन घाम येण्याची आणि थंड होण्याची क्षमता कमी होणे.
  • जाड आणि अति घट्ट कपडे घालून घामाचे बाष्पीभवन रोखणे.
  • नवजात बाळ, लहान मुले, आणि वृद्धांच्या शरीराची तापमान नियंत्रण क्षमता कमी असल्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता वाढते.
  • काही वैद्यकीय परिस्थिती जसे की हृदयविकार, लठ्ठपणा आणि श्वसनाचे आजार यांमुळे धोका वाढू शकतो.
  • सतत औषधे घेतल्यामुळे हायड्रेशन कमी होऊन शरीराच्या उष्णतेला प्रतिसाद देणाऱ्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

उष्माघाताचा त्रास झाल्यास  जलद उपचार कोणते करावेत ?

उष्माघाताचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खालील काही त्वरित उपचार करू शकतात:

  • व्यक्तीला उन्हातून दूर सावलीत गार हवेच्या ठिकाणी बसवा.
  • शरीराचे तापमान थंड करण्यासाठी कुठल्याही उपलब्ध साधनाचा वापर करा.
  • मानेवर, काखेत, मांडीवर थंड पाणी किंवा बर्फ लावा.
  • ओल्या कापडाने किंवा पाण्याने त्वचा ओली करा.
  • ती व्यक्ती शुद्धीत असेल तर थंड पाणी किंवा इलेक्ट्रोलाइटचे पेय पाजा.
  • शरीरातून उष्णता निघून जाण्यासाठी जास्तीचे कपडे काढून हवेत बसा.
  • शरीराचे तापमान तपासत रहा आणि 102°F (39°C) च्या खाली येईपर्यंत उपाय सुरू ठेवा.
  • तापमान कमी झाल्यावर वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उष्माघातापासून बचाव कसा कराल ?

उष्माघात टाळण्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे आहेत आणि काही सवयींचे पालन करणे सुद्धा आवश्यक आहे.

  • दिवसभर भरपूर पाणी प्या आणि गरम हवामानात जाणार असाल किंवा व्यायाम करत असाल तर विशेष लक्ष द्या.
  • भर उन्हात घराबाहेर पडू नका जर गरजेचे असेल तर संरक्षणात्मक कपडे आणि टोपी घाला तसेच त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लावा.
  • उष्ण ठिकाणी काम करत असाल तर थोड्या थोड्या वेळात सावलीच्या ठिकाणी गार हवेत विश्रांती घ्या.
  • हलका व पचनास सोपा असणाऱ्या आहाराची निवड करा. शरीर थंड ठेवणाऱ्या पेयांचे , फळांच्या रसाचे सेवन करा.
  • हवेशीर, हलके, मोकळे आणि हलक्या रंगाचे कपडे घाला.

सारांश

उष्माघाताकडे त्वरित लक्ष देणे आणि योग्य उपाय करणे अत्यावश्यक आहे पण त्यासाठी तुम्हाला त्याची लक्षणे, कारणे तसेच उपाय माहिती असणे खूप महत्वाचे आहे. उष्माघातापासून स्वतःला आणि इतरांना वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. घरगुती उपाय केल्यानंतर जरी आराम वाटत असला तरी त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

FAQ

उष्माघाताचा सर्वाधिक धोका कोणाला आहे?

अर्भक, लहान मुले, वयोवृद्ध माणसं आणि दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्ती यांना उष्माघाताचा धोका जास्त असतो.

उष्माघातामूळे मृत्यू होऊ शकतो का?

योग्य वेळेत उपचार न केल्यास उष्माघातामुळे अनेक अवयव निकामी होऊ लागतात, मेंदू व हृदयासंबंधी समस्या उद्भवतात आणि काही गंभीर स्थितीत मृत्यू होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top