मार्च ते मे महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत जाते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, अशक्तपणा वाढणे, काम कमी केले तरी जास्त दमायला होणे तसेच घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जाणे, ह्या बाबींची देखील सुरुवात होते.
तापमान बदल व वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी घेतली नाही तर उन्हाळ्यामुळे उध्दभवणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
1)उष्माघात /Heatstroke:- हा उन्हाळ्यात वारंवार होणारा आजार आहे. जो उष्ण तापमानाच्या विस्तारित संपर्कामुळे होतो. उच्च तापमानामुळे याला “हायपरथर्मिया” असेही म्हणतात.
चक्कर येणे , मळमळ , उलट्या होणे, डोकेदुखी आणि अशक्तपणा यासारखी उष्माघाताची लक्षणे आधी दिसतात आणि यामुळे अवयव निकामी होतात ,व्यक्ती बेशुद्ध होतो आणि मृत्यूसुद्धा संभवतो.
2)अन्न विषबाधा /Food poisoning:- उन्हाळी महिन्यात अन्न विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते. कारण ऊबदारपणा जिवाणूंच्या वाढीसाठी एक आदर्श वातावरण तयार करतो , ज्यामुळे अन्न दूषित होऊ शकते हे जिवाणू, विषाणू, रसायने आणि विषारी पदार्थ द्वारे पसरते. जे मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर पोटात अस्वस्थता, मळमळ उलट्या आणि अतिसार निर्माण करतात.
3) निर्जलीकरण/ Dehydration :- मानवी शरीरात पाण्याचे संतुलन योग्य प्रमाणात ठेवणे या दिवसात गरजेचे असते. रोज जवळपास आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. या दिवसात कमी पाणी पिणे आणि जास्त वेळ उन्हात राहणे यामुळे डीहायड्रेशनची समस्या होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नुकसान होऊ शकते. चक्कर येणे अशक्तपणा वाटणे आणि तीव्र तहान लागणे ही डिहायड्रेशन ची लक्षणे आहेत.
4) विषाणूजन्यताप / Viral fever – जास्त ताप ,अंग दुखी, घशात खवखवणे, सर्दी, डोके दुखणे हे या रोगाची लक्षणे आहेत .हा त्रास टाळण्यासाठी योग्य प्रमाणात हलक्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.
5)जुलाब / Diarrhea – हा आजारी या दिवसात बाहेरील पदार्थ, दूषित पाणी ,अतितिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने होण्याची शक्यता अधिक असते. पोटावर सूज येणे. पोट दुखते आणि सतत शौचास जावे लागते. ही या आजाराची लक्षणे आहेत.
6) तीव्र डोकेदुखी /Migraine:- उष्णतेमुळे तीव्र डोकेदुखीची समस्या अधिक भेडसावू शकते. उष्णतेमुळे या प्रकारच्या डोकेदुखीमध्ये रक्त वाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होतो . यात डोकेदुखी समोरच्या बाजूने सुरु होऊन मागच्या बाजूपर्यंत जाते. जास्त वेळ उन्हात घालवल्याने ही समस्या अधिक जाणवते.
7) उन्हाळी लागणे:- उन्हाळी म्हणजे लघवीला आग व गरम होणे. मूत्राची आम्लता वाढल्याने उन्हाळी लागते. त्यामुळे अंतर्गत त्वचेमध्ये दाह निर्माण होतो. परिणामतः मूत्रमार्गाची तीव्र जळजळ वाढते.
8) घोळणा फुटणे:- उन्हाळ्यामध्ये नाकातून कोणत्याही बाह्य आघाताशिवाय अचानक रक्तस्त्राव होतो यालाच घोळणा फुटणे म्हणतात. वातावरणातील तापमान अचानक वाढून हवेतील कोरडेपणा खूप वाढला तर या प्रकारचा त्रास काही रुग्णांमध्ये दिसतो. नाकाच्या पुढच्या भागातील नाजूक रक्त वाहिन्या उष्णता , अतिरक्तदाबामुळे फुगतात आणि फुटतात. यामुळे नाकातून रक्तस्त्राव होतो. आयुर्वेदामध्ये याला “नासागत रक्तपित्त” असे म्हणतात.
9) डोळ्याची आगहोणे , जळजळहोणे. – अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे. यातच उन्हाळ्यात आणखी भर पडते प्रखर सूर्यप्रकाश व वाढती उष्णता याची. यामुळे डोळ्यांची जळजळ होणे ,डोळ्यांची आग होणे , डोळे लाल होणे, डोळे बंद केल्यानंतर गरम लागणे, अशा प्रकारच्या समस्या खूप पाहायला मिळतात.
उन्हाळ्यातील समस्यांवर रामबाण उपाय
1) ताजे व गरम अन्न सेवन करा.
2) आहारात पालेभाज्या, फळांचा समावेश करा.
3) विटामिन सी युक्त आहार घ्यावा
4) दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या किंवा फळांचे रस,सरबत, उसाचा रस,नारळ पाणी, जलजीरा, ताक यांचा समावेश करा.
5) जवळ खडीसाखर, काळ्या मनुका,आवळा, बत्तासा ठेवावे व मधून मधून खावे.
6) धने जिरे पाणी भिजवून गाळून घ्यावे व थोडे थोडे पीत राहावे दाह कमी होतो.
7) डोळ्यावर गुलाब पाण्याच्या घड्या ठेवाव्यात, डोळ्याचे आग कमी होते
8)बाहेर जाताना सुती स्कार्फ ,हॅट, उत्तम दर्जाचा गॉगल वापरा.
9) तळपायाच्या मध्यभागी गाईचे तूप चोळावे यामुळे डोळे शांत होतात.
10) चक्कर आल्यास कांदा फोडून त्याचा वास घ्यावा
11) घोळणा फुटण्याचा त्रास झाल्यास दुर्वांचा रस नाकात घालावा.
12) भर उन्हात घराबाहेर पडू नका.
13) आरामदायक कपडे घालावे ज्यामुळे शरीराला पुरेशी हवा आणि थंडावा मिळतो.
14) शिळे व तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
15) नियमित व्यायाम करा.
16)पुरेशी झोप घ्या.
17) दिवसातून दोनदा अंघोळ करावी.
18) धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
सारांश :
योग्य दिनचर्या आणि आहारातील बदल तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना नक्कीच सुरक्षित ठेवेल. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याचे आणि तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्याचे हे खूप सोपे मार्ग आहेत. या सोप्या उपायांचा वापर करून उन्हाळ्यातील सुट्टीचा कुटुंबीयांसोबत आनंद घ्या.
FAQ
- उन्हाळा तुमच्यावर आरोग्यावर कसा परिणाम करतो ?
उष्णतेमुळे खाण्याच्या सवयी आणि झोपेच्या सवयी बदलतात, त्यामुळे पूर्ण दिनचर्या बिघडली जाते आणि उन्हाळ्यात तुमच्यावर आरोग्यावर परिणाम होतो .
2) उन्हाळ्यात आरोग्याला सगळ्यात जास्त धोका कशामुळे होतो ?
उन्हाळ्यात सगळ्यात जास्त धोका आरोग्याला डीहायड्रेशन /निर्जलीकरण, हिट स्ट्रोक किंवा उष्माघात ,विषाणूजन्य तापामुळे होतो.
उपयुक्त माहिती