उन्हाळ्यात वाढत जाणारे तापमान आणि कोरडी हवा यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हवेतील कोरडेपणाचा आणि उष्ण वातावरणाचा त्वचेवर परिणाम होतो.
त्वचेच्या अनेक समस्या उद्भभवतात. त्वचा कोरडी होणे, निस्तेज दिसणे ,घामोळे येणे, काहींना सनबर्नचा त्रास होतो. या सगळ्या समस्या टाळण्यासाठी वेळीच त्वचेचे संरक्षण करणे आवश्यक आहे. योग्य दिनचर्या आयुर्वेदिक उपचारांचा वापर करून उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची याची सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
सारणी-
- उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्या किंवा फंगल इन्फेक्शन – उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्या वर उपाय
- उन्हाळ्यात त्वचा काळवंडने , सन बर्न किंवा वांग येणे – त्वचा काळवंडने किंवा वांग येणे यावर उपाय
- त्वचेची रुक्षता – रुक्ष आणि कोरड्या त्वचेवर उपाय
- मुरमे / ब्रेक आउट्स – मुरुमांवर उपाय
- सारांश
- प्रश्नोत्तरे
उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्या किंवा फंगल इन्फेक्शन :-
उन्हाळ्यात त्वचेच्या वरच्या आवरणात असलेल्या घामाच्या ग्रंथी आद्रता रोखण्याचा प्रयत्न करतात, घामामध्ये आढळणाऱ्या टाकाऊ पदार्थांमुळे अंगाला खाज येऊन लाल पुरळ येतात त्यालाच घामोळ्या म्हणतात.
उपाय :-
- थंड पाण्याने अंघोळ करावी.
- गुलाब पाण्याचा चेहऱ्यावर स्प्रे करावा.
- उन्हाळ्यात रसाळ फळे आणि भाज्या ,कोशिंबिरी भरपूर खावीत.
- चंदन पावडर, गोपीचंदन,वाळा, व ब्राह्मी ही चूर्ण एकत्र करून एक चमचा + एक चमचा मुलतानी माती ,गुलाब पाण्यात भिजून चेहऱ्यास लावावे हा पॅक घामोळ्या वर लावावा.
- एक कॉटनचा हात रुमाल वरचेवर ओला करून चेहऱ्यावर ठेवावा म्हणजे घामोळे आणि सनबर्न दोन्हीचा त्रास होणार नाही.
- उन्हाळ्यात वर्षभर माठातले थंड पाणी ,गोडसर ताक ,नारळ पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत वगैरे पेय पान करावे.
- दही + मध मिश्रणात ग्लिसरीन टाकून हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यास त्वचेचे सौंदर्य अधिक खुलून जाते.
- मोजे रोज बदलावेत बूट घालताना पायांना फेस वा बॉडी पावडर लावावी.
- उन्हाळ्यात त्वचा काळवंडणे, सन बर्न किंवा वांग येणे :-
तीव्र सूर्यप्रकाशात त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेतील मेलेनिन हे सूर्याच्या अतिरेक किरणापासून त्वचेचे संरक्षण करते. यामुळे त्वचा जळते आणि तिची लवचिकता कमी होते. त्यामुळे त्वचा अधिक मेलेनिन तयार करते आणि गडद होते.
अति उन्हात फिरल्याने चेहऱ्यावर वांग वाढते जे लवकर बरे होत नाही व सौंदर्यास बाधक ठरते.
उपाय :-
- छत्री ,टोपी ,सनस्क्रीन कॅलामाईन लोशन लावून उन्हात बाहेर पडावे.
- त्वचा काळवंडने रोखण्यासाठी लोण्यामध्ये थोडी खसखस घालून आधी स्क्रबिंग करावे व नंतर चेहरा धुवून मुगाच्या डाळीचे पीठ डाळिंबाच्या रसात कालवून चेहऱ्यास पॅक लावावा.
- सीझनमध्ये मिळणारी फळे जसे टरबूज ,खरबूज ,पपई ,अननस ,डाळिंब इत्यादी फळांचा रस त्वचेला लावल्याने काळेपणा कमी येतो.
2) त्वचेची रुक्षता :-
आपल्या त्वचेत घाम व तेल उत्पन्न करणाऱ्या ग्रंथी असतात. तेल ग्रंथीच्या पुरवठ्यामुळे त्वचेस स्निग्धता ,मुलायमपणा प्राप्त होतो. काही स्त्रियांच्या त्वचेमध्ये उन्हामुळे तेल ग्रंथीची कार्यक्षमता कमी होते व त्यामुळे त्वचा कोरडी पडते.
उपाय :-
- नारळ पाणी, भाताची पेज,धने +जिरे+ सब्जा पाणी, वाळ्याचे सरबत भरपूर प्रमाणात घ्यावे.
- उन्हाळ्यात तुळशीचे बी, काळ्या मनुका रात्री भिजवून घालून सकाळी खाव्यात.
- प्रवाळयुक्त गुलकंद पाण्यात घालून सरबतसारखे सारखे प्यावे.
- रात्री झोपताना पाय स्वच्छ थंड पाण्याने धुऊन झोपावे. पायांना मुलतानी माती लेप लावावा.
- आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने, गुलाबाच्या पाकळ्या, ओदी कोलोनचे ड्रॉप टाकावेत.
- त्वचेत स्निग्धता आणण्यासाठी साय, तूप, लोणी, ऑइल बेस असणारी क्रीम,तेल याचा उपयोग करून त्वचेत मुलायमपणा आणता येतो.
- चेहऱ्यावर साबणाचा अतिरेक टाळावा, त्या ऐवजी डाळीचे पीठ दूध किंवा तुपाबरोबर बरोबर लावावे. अथवा उटण्याचा वापर करावा.
- उन्हाळ्यात मेकअप हलका व वॉटरप्रूफ असावा.
- कपडे सुती वापरावेत. कपड्यांचे रंग पांढरे व फिक्या रंगाचे असावेत.
3) मुरमे / ब्रेक आउट्स :-
उष्ण आणि दमट हवामान देखील मुरुमांच्या वारंवार ब्रेक आउटला उत्तेजन देते. याचे कारण असे की उष्णतेमुळे त्वचेमध्ये अधिक तेलाचे उत्पादन होते, ज्यामुळे त्वचेवरील लहान छिद्रे अवरोधित होऊन मुरुम तयार होतात .
उपाय :-
- दिवसातून दोन वेळा चेहरा फेस वॉशने धुवावा.
- एलोवेरा जेल, सिरम असे पाणी तत्व असणारे चेहऱ्यावर लावावे.
- काकडी रस +तुरटी +कापुरवडी +लिंबू रस याच्या मिश्रणाचा चेहऱ्यावर स्प्रे करावा.
सारांश :-
याशिवाय उन्हाळ्यात जर तुम्ही त्वचेच्या कोणत्याही गंभीर समस्येचा सामना करत असला तर उपचारासाठी योग्य त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.
दैनंदिन आहारात थंड प्रकृतीचे पदार्थ, भरपूर फळे, थंडपेय यांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने त्वचेची वेळीच आणि योग्य काळजी घेतली तर तुमची त्वचा अधिक तजेलदार आणि टवटवीत दिसू शकेल. यामुळे उन्हाळ्यात उध्दभवणाऱ्या त्वचेच्या समस्यांना तुम्ही दूर ठेवू शकाल .
FAQ :-
उन्हाळा नेहमी त्वचेसाठी त्रासदायक का ठरतो?
उन्हाळ्यात वाढणारी उष्णता, प्रखर सूर्यप्रकाश यामुळे सतत घाम येत असतो. या घामामध्ये जिवाणू, जंतू, अतिरिक्त तेल मिसळल्यामुळे त्वचेवर त्याचा थेट परिणाम होत असतो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात, म्हणून उन्हाळा नेहमी त्वचेसाठी त्रासदायक ठरतो.
उन्हाळ्यात त्वचेचा ओलावा कसा टिकून ठेवावा?
उन्हाळ्यात त्वचा साफ ठेवणे, दिवसभरामध्ये आठ ते दहा ग्लास पाणी पिणे हंगामी फळांचे जास्तीत जास्त सेवन करणे उन्हाळ्यात अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्यात मेकअप करताना कमीत कमी कॉस्मेटिक चा वापर करावा. निश्चितच त्वचेचा ओलावा ठेवण्यास याने मदत होईल.
उन्हाळ्यात त्वचेसाठी व्हिटॅमिन सी चांगले आहे का?
विटामिन सी असणारे पदार्थ त्यातील एंटीऑक्सीडेंट घटकामुळे त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते. यामुळे त्वचेचा नैसर्गिक मुलायमपणा टिकून राहतो.
Well informative article and helpful me