अल्कोहोलचे शरीरावर होणारे 10 हानिकारक परिणाम  

alkoghol 2714482 640 1

अल्कोहोलचे शरीरावर होणारे 10 हानिकारक परिणाम  

जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये मद्यपान करणे ही एक सामान्य सामाजिक बाब आहे आणि मध्यम स्वरूपात करणे हे अनेकदा स्वीकार्य मानले जाते. परंतु ही घातक सवय अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांचे कारण ठरू शकते. जास्त प्रमाणात किंवा नियमित मद्यपान केल्याने आपल्या आरोग्यावर अनेक गंभीर अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रभाव होऊ शकतात. अल्कोहोलचा शरीरावर कसा परिणाम होतो आणि त्याच्या सेवनाशी संबंधित संभाव्य धोके आपण सविस्तर पाहणार आहोत.

1) मेंदूवर परिणाम

अल्कोहोलमध्ये इथेनॉल असल्याने मेंदूवर विविध दुष्परिणाम होऊ शकतात जसे की मेंदूच्या पेशींमधील संवाद कमी होऊन स्वतःवरचा ताबा सुटणे. मध्यवर्ती मज्जासंस्थेवर घातक परिमाण होऊन मेंदूचे कार्य तसेच इतर न्यूरल क्रिया मंदावतात यामुळे पाय आणि हातांमध्ये वेदना, सुन्नपणा अश्या प्रकारचे त्रास जाणवतात. त्याचे दीर्घकाळ व्यसन मेंदूवर खूप गंभीर नुकसान करते ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, स्मृतीभ्रंश होणे, नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक विकारांचा धोका वाढणे यांसारखे परिमाण दिसू लागतात.

2) यकृतावर परिणाम

यकृत हे चयापचयासाठी  महत्वाचा अवयव आहे जे शरीरातून विषारी आणि हानिकारक पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने यकृतावर परिणाम होतो, ज्यामुळे फॅटी ऍसिडस् तयार होतात आणि यकृतासंबंधी रोगाचा धोका वाढत जातो. कालांतराने, हे अल्कोहोलिक हिपॅटायटीस आणि सिरॉयसिस सारख्या अधिक गंभीर परिस्थिती ओढवू शकतात. यकृताची असह्य जळजळ  होऊ शकते, काही वेळा  परिस्थिति जीवघेण्या होऊ शकते आणि काही प्रकरणांमध्ये यकृत प्रत्यारोपणाची देखील आवश्यकता भासू शकते.

3) हृदय व रक्तवाहिन्यांवर परिणाम

ह्दयविकार आजकाल प्रमुख चिंतेचा विषय आहे जो मद्यपानामुळे अधिक गंभीर होताना दिसून येत आहे. ही सवय दीर्घकाळ राहिल्याने हृदयावर आणि फुफ्फुसांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. हृदयविकाराचा झटका, हृदयाचे स्नायू कमकुवत होणे, उच्च रक्तदाब आणि अनियमित हृदयाचे ठोके यांसारखे अनेक घातक परिणाम वाढू शकतात. रक्ताभिसरण प्रणालीवर सुद्धा धोकादायक प्रभाव होतात जसे अन्नातून जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून घेण्यात अडचणी निर्माण होतात ज्यामुळे थकवा येतो, अशक्तपणा वाढतो आणि लाल रक्तपेशींची संख्या कमी होते.

4) पचनसंस्थेवर परिणाम

अल्कोहोल काही घातक घटकांमुळे पचनसंस्थेसाठी त्रासदायक ठरते आणि विविध जठर व आतड्यांविषयी समस्यांना कारणीभूत ठरू शकते. हे पोटातील ऍसिडचे प्रमाण वाढवते ज्यामुळे जठराला सूज येते, जळजळ वाढते आणि पोटात अल्सर होण्याची शक्यता वाढते. पोषक तत्वांच्या शोषणात व्यत्यय येऊ लागतो ज्यामुळे अनेक पोषक तत्वांची शरीरात कमतरता होते व अशक्तपणा जाणवू शकतो. दीर्घकाळ किंवा नियमित मद्यपानाचा स्वादुपिंडावर गंभीर प्रभाव होऊन ज्यात स्वादुपिंडाचा दाह होऊन अश्या वेदनादायक स्थितीचा थेट पचनावर परिणाम होतो.

5) रोगप्रतिकार शक्तीवर घातक परिणाम

अल्कोहोलच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते ज्यामुळे शरीराला संसर्गापासून बरे होण्यास अडथळा निर्माण करते, आजारांचा कालावधी वाढवते तसेच शरीराला इतर एलर्जीचे व आजारांचे संक्रमण होण्याची शक्यता वाढते. हे पांढऱ्या रक्त पेशींचे ज्या संक्रमणांशी लढण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत त्यांच्या उत्पादनाचे कार्य बिघडते आणि रोगप्रतिकरक शक्तीवर परिणाम करते. नियमित सेवन करणाऱ्या लोकांना न्युमोनिया, क्षयरोग यांसारखे आजार होण्याची शक्यता जास्त असते.

man 428392 640 1

6) मानसिक आरोग्यावर परिणाम

मद्याचे सेवन सुरुवातीला जरी आनंददायी वाटत असले तरी दीर्घकालीन सेवनामुळे मानसिक आरोग्याचे विकार होण्याचे संभाव्य धोके वाढतात. ह्याचा मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो ज्यामुळे उदासीनता आणि चिंता वाढते. मोहाच्या बळी पडून अनेकजण व्यसनाच्या चक्रात अडकतात जे खंडित करणे कठीण होते आणि त्यामुळे अजूनच मानसिक त्रास वाढतो.

7) झोपेवर परिणाम

अनेकदा लोक आराम मिळण्यासाठी आणि झोपायला मदत मिळण्यासाठी मद्यपान करतात. यामुळे लवकर झोपायला मदत होऊ शकते, परंतु ते झोपेच्या चक्रावर परिणाम करते, जलद डोळ्यांची हालचाल वाढवते, झोपेचे प्रमाण कमी करते ज्याचा एकूणच शरीरावर घातक परिणाम होताना दिसतो. झोपेची गुणवत्ता खराब झाल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो, एकाग्रता कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.

8) प्रजनन प्राणलीवर परिणाम

मद्यपान पुरुष आणि स्त्री दोघांच्या प्रजनन आरोग्यावर विपरित परिणाम करू शकते. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊन शुक्राणूंची संख्या कमी होते आणि प्रजाननावर परिणाम होतो. स्त्रियांमध्ये मासिक पाळीत व्यत्यय येऊन प्रजाननावर परिणाम होऊ शकतो तसेच वंध्यत्वाचा धोका वाढू शकतो. गर्भवती स्त्रीयांनी सेवन केल्यास बाळाला विकासात्मक समस्या उध्दभवतात आणि आयुष्यभर अपंगत्व येऊ शकते.

9) कर्करोग

मद्याचे सेवन हे अनेक प्रकारच्या कर्करोगांचे व इतर संभाव्य आजारांचे ठोस कारण आहे. ह्यामुळे अनेक प्रकारचे म्हणजेच अन्ननलिका, तोंड, घसा, यकृत, स्तन आणि आतड्याच्या संबंधित कर्करोग होऊ शकतात. अति प्रमाणात धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना हा धोका जास्त असतो, कारण दोन्हीमध्ये कर्करोगासंबंधीचे घटक असतात.

10) स्थूलता

अल्कोहोलमध्ये रिक्त कॅलरी जास्त असतात आणि म्हणूनच ते पौष्टिक मूल्यांशिवायच शरीराला ऊर्जा देते. दीर्घकाळ नियमित सेवनामुळे वजन आणि लठ्ठपणा वाढू शकतो ज्यामुळे मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि विशिष्ट कर्करोग यांसारख्या आरोग्याच्या समस्या वाढू लागतात. ह्या सेवनामुळे भूक देखील उत्तेजित होते आणि जास्त प्रमाणात खाण्यास कारणीभूत ठरते, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

सारांश 

मद्याचे हानिकारक प्रभाव केवळ शारीरिक आरोग्यापुरते मर्यादित नाहीत तर  ते जीवनाच्या सामाजिक आणि आर्थिक पैलूंवर देखील दिसून येतात. गैरवर्तणूक, तणावपूर्ण संबंध, घरगुती हिंसाचार आणि मुलांकडे दुर्लक्ष, नोकरीच्या कामगिरीवर परिणाम, आर्थिक समस्या असे अनेक त्रासदायक गोष्टी घडू शकतात. या जोखमींबद्दल जागरुक असणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेणे हे नेहमीच महत्त्वाचे ठरते. ह्या व्यसनाशी झुंजणाऱ्यांसाठी, आरोग्यासंबंधी नुकसान टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि कुटुंबाची मदत घेणे आवश्यक ठरते. वेळेतच मद्यपान मोह टाळणे  निरोगी जीवनशैली जोपासण्यास तसेच दीर्घ, आणि अधिक परिपूर्ण जीवन जगण्यास  कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी खूप महत्वाचे ठरते.

FAQ

मद्यपान कसे कमी होऊ शकते किंवा सोडता येऊ शकते का ?

मद्यपानाची सवय लाऊन घेणे हेच धोकादायक आहे म्हणूनच आपल्या रुटीन मधील चांगल्या सवयींच्या हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. चांगल्या गोष्टींमध्ये मन रमवा, छंद जोपासा, मित्र व कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा आणि इतर आरोग्यदायी सवयी जोपासा.

अल्कोहोलच्या सेवनाने त्वचेवर एलर्जि होऊ शकते का? 

दररोजच्या सेवनाने तुमच्या त्वचेवर इफेक्ट होताना दिसतात जसे की त्वचा अधिक कोरडी, निस्तेज, सैल होत त्यामुळे त्वचेवर पुरळ, लालसरपणा आणि इतर अनेक समस्या निर्माण होतात. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आणि अकाली वृद्धत्व सुद्धा जाणवून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top